Thursday 19 May 2022

DIO BULDANA NEWS 19.5.2022

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

  • अर्ज सादर करण्याचे आवाहन; 6 जुन अंतिम मुदत

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 व 16 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे.

  प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयात शिष्यवृत्ती चा विहित नमुना अर्ज उपलब्ध आहे. परदेशात पदवी/ पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या जिल्हयातील रहिवासी असणा-या अनुसूचित जमातीचे विदयार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला कार्यालयातून विहित नमुन्यातील शिष्यवृत्ती अर्ज प्राप्त करावा. सदर अर्ज परिपुर्ण भरून व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे प्रमाणित प्रतींसह प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांचे कार्यालयात दिनांक 6 जुन 2022 पर्यंत सादर करावा. अर्ज करण्याकरीता आवश्यक असलेली पात्रता, अटी व शर्ती प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या सुचना फलकावर उपलबध आहे, असे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                            ***********

बुलडाणा तालुक्यातील तीन गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : तालुक्यातील पिंपळगांव सराई, इजलापूर व सावळा या तीन गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. इजलापूर  येथील लोकसंख्या 715 असून येथे दररोज 33 हजार 500 लीटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. सावळा येथील लोकसंख्या 814 आहे. येथे दररोज 33 हजार 460 लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. तसेच पिंपळगांव सराई येथील लोकसंख्या 5592 असून येथे दररोज 1 लक्ष 67 हजार लीटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी,  बुलडाणा  यांनी कळविले आहे.

                                                            *******



उद्यमित्रा यात्रेचा थाटात शुभारंभ

  • नगर पालिकेच्या सभागृहात प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांचे अंतर्गत युथ एड फाउंडेशन, पुणे या संस्थेमार्फत बुलडाणा शहरात आज 19 मे रोजी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर

श्री. गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ करण्यात आला.

  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्या समवेत Promoting Micro-Entrepreneurship करीता विना अनुदान तत्वावर सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करार अंतर्गत राज्यातील विविध जिल्हयामधील तळागळातील उमेदवारांचे समुपदेशन करून स्वयंरोजगार सुरू करण्याकरीता युथ एड फाउंडेशन संस्थेंमार्फत बीज भांडवल प्रदान करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील यात्रेच्या शुभारंभानंतर प्रशिक्षण कार्यक्रम नगरपालिका बुलडाणा येथील सभागृहात उत्साहात पार पडला.  सदर कार्यक्रमामध्ये युथ एड फाउंडेशन पुणे चे अध्यक्ष मॅथ्यू महम, राज्य समन्वयक मनोज भोसले, सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर, महाव्यवस्थापक सुनिल पाटील, उपमुख्याधिकारी श्री. गोरे, राष्ट्रीय नागरी जिवन्नोनती अभियानाचे सहायक प्रकल्पाधिकारी श्रीमती वैशाली गायकवाड, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी प्रमोद खोडे, माविमचे श्री.कुंदन, महात्मा गांधी नॅशनल फेलो श्रीमती शिवानी तावडे,आदी उपस्थित होते.

   सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पन करण्यात आला. तदनंतर दिपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. सदर कार्यक्रमात मॅथ्यू महम यांनी महिलांना उद्योग निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, बाजारपेठेत प्रसिध्दी कशी करावी, स्वंयरोजगार कसा निर्माण करावा आदीबाबत मार्गदर्शन केले. या तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना याबाबत प्रशिक्षण देणार असल्याबाबत सांगीतले. श्रीमती बारस्कर यांनी जिजाऊ माँ साहेब यांचा वारसा मिळालेल्या बुलडाणा जिल्हयातील महिला या खंबीर असून स्वंयरोजगार करण्यासाठी स्वयंपूर्ण असल्याबाबत सांगीतले. एक पाऊल स्वयंरोजगाराकडे या युथ एड फाउंडेशन, पुणे या संस्थेंच्या घोषवाक्याप्रमाणे महिलांनी नोकरी मिळेल या आशेवर अवलंबून न राहता स्वत:चा स्वयंरोजगार सुरू केला पाहिजे, असे आवाहन केले.

  सुनिल पाटील यांनी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम व इतर योजनांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अधिकाधीक महिलांनी प्रकल्प अहवाल कार्यालयाकडे सादर करून रोजगार/उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. या उद्यमिता यात्रेद्वारे जिल्हा स्तरावर सुशिक्षित बेरोजगार व नवउद्योजक महिलांना 21 मे पर्यंत नगरपालिका बुलडाणा येथील सभागृहामध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे. संचलन महेंद्र सोभागे यांनी तर आभार प्रदर्शन शफीउल्ला सय्यद यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील श्रीमती सविता वाकोडेनंदू मेहेत्रे, संतोष पडघानसिध्देश्वर खेडेकर यांनी व नगरपालिका बुलडाणा येथील कर्मचारी आणि मिलींद हिरवळे, समन्वयक यांनी प्रयत्न केले.

 

शैक्षणिक वर्ष 2022- 23 ची आरटीई 25 टक्के प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया सुरू

· प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेशाला 19 मे पासून प्रारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि. 19 : जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2022-23 या वर्षांच्या आरटीई 25 टक्के प्रक्रियेच्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) 30 मार्च 2022 रोजी राज्यस्तरावरुन काढण्यात आलेली आहे.

    निवड यादीतील बालकांचे प्रवेश शाळेत जावून घेण्याची मुदत 10 मे 2022 पर्यंत देण्यात आलेली होती.  तसेच या प्रवेश प्रक्रियेनुसार सन 2022-23 मधील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया 19 मे 2022 रोजी सुरू झाली असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे पालकांना एसएमएस जाण्यास सुरूवात झाली आहे.  मात्र पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर भेट देवून अर्जांची स्थिती तपासणे मळत्वाची आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व पालकांनी नोंद घ्यावी. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून अलॉयमेंट लेटरची प्रिंट काढून विहीत मुदतीत तालुका स्तरावरील कागदपत्रे पडताळणी समिती केंद्रावर जावे. कागदपत्र पडताळणी ही 19 ते 27 मे दरम्यान करण्यात येणार आहे. याच कालावधीत कागदपत्रे पडताळणी होणे अनिवार्य आहे. तरी याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक व तालुकास्तरावरील संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी. जास्तीत जास्त बालकांना प्रक्रियेत सहभागी करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किशोर पागोरे यांनी केले आहे.

                                                                                                *********


--

No comments:

Post a Comment