Saturday 31 October 2020

DIO BULDANA NEWS 31.10.2020

 सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान

  • चार महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
  • शेंदूर्जन महसूल मंडळात चार वेळा अतिवृष्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  जिल्ह्यात माहे जून ते सप्टेंबरच्या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान सिंदखेड राजा तालुक्यात झाले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात 7 महसूल मंडळे आहेत. तालुक्यात पूर्णा नदी काठच्या साठेगाव, निमगाव वायाळ, हिरवखेड पुर्णा, तढेगाव, राहेरी खु, राहेरी बु, पिंपळगाव कुंडा, ताडशिवणी, लिंगा, देवखेड, तांदुळवाडी, येथील क्षेत्र पाण्याखाली आले होते.

   तसेच पाताळगंगा नदीकाठावरील सिंदखेड राजा शिवार, आलापूर, सवखेड तेजन, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी, या गाव शिवारात पाणी साचून जमीन देखील खरडून गेली आहेयामुळे पिकांचे नुकसान झाले. बेलगाव नदीकाठावरील सोयंदेव,  सोनोशी, वर्डदी, रुमना या गावांच्या शिवारात नदी दुधडी वाहून पिके पाण्याखाली गेली. त्याचप्रमाणे वाघोरा नदीकाठी बोरखेडी जलाल, तांदुळवाडी, महारखेड, पांगरखेड, हनुवतखेड येथे पावसाच्या पाण्यामुळे पिके पाण्याखाली गेली.

  सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा महसूल मंडळात 21 सप्टेंबर रोजी 24 तासात 96 मि.मी पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद झाली, तर साखरखेर्डा मंडळात 21 सप्टेंबर रोजीच 24 तासात 65 मि.मी, सिंदखेड राजा मंडळात 21 सप्टेंबर रोजीच 24 तासात 87.75 मि.मी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे शेंदूर्जन महसूल मंडळात 26 जून रोजी 87.75 मि.मी, 3 ऑगस्ट रोजी 82.75 मि.मी, 11 ऑगस्ट रोजी 87.25 मि.मी व 21 सप्टेंबर 2020 रोजी 73.25 मि.मी पाऊस पडला. या मंडळात चार वेळा अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.

    या चारही महसूल मंडळात एकाच दिवशी 21 सप्टेंबर 2020 रोजी अतिवृष्टी झाल्याने शेतात पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतात पाणी घुसून एकाच दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी राहून हाती आलेल्या 59096 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या 13 मे 2015 च्या निर्णयानुसार पुर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून शासनास नुकसानीचा अहवाल सादर करण्यात आला आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

****************

             शिथील करण्यात आलेले निर्बंधासह टाळेबंदीचा कालावधी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविला

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार जिल्ह्यात कोविड या संसर्गजन्य साथरोगाच्या नियंत्रणासाठी अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या 1 ऑक्टोंबर 2020 च्या आदेशानुसार जिल्ह्यात टाळेंबंदीचा कालावधी 31 ऑक्टोंबर 2020 पावेतो वाढविण्यात आला होता. तसेच जिल्ह्यासाठी शासनाकडून वेळोवेळी शिथील करण्यात आलेले निर्बंध व सुट देण्यात आलेल्या बाबी कायम ठेवून टाळेबंदीचा कालावधी शासनाच्या आदेशानुसार 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

    कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेले आदेश, नियमावली अर्थात एसओपी नुसार जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेले आदेश लागू राहणार आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी एस राममूर्ती यांनी कळविले आहे.

                                                                        *************


जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी व इंदिरा गांधी यांना अभिवादन

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  देशाचे पहिले गृह मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 145 वी जयंती आहे. तसेच महर्षी वाल्मिकी यांची सुद्धा आज जयंती आहे. तर देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल, महर्षी वाल्मिकी व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी या तीनही प्रतिमांना पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना पुष्प अर्पन करून अभिवादन केले.

**********

जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची सुधारीत पैसेवारी जाहीर

  • 366 गावांची 50 पैशांच्या आत, तर 1053 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या वर

बुलडाणा,(जिमाका) दि.31:  सन 2020 -21 या खरीप हंगामातील जिल्ह्याची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.  ही सुधारीत पैसेवारी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांची आहे. यामध्ये 366 गावांची पैसेवारी 50 पैशांच्या कमी  आली असून 1053 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आली आहे.

  तालुकानिहाय 50 पैशांपेक्षा जास्त व 50 पैशांपेक्षा कमी सुधारीत पैसेवारी पुढीलप्रमाणे : बुलडाणा – एकूण गावे 98, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्या पेक्षा जास्त, सुधारीत  पैसेवारी 74, चिखली : एकूण गावे 144, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 63, दे. राजा : एकूण गावे 64, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 57, मेहकर : एकूण गावे 161, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 47, लोणार : एकूण गावे 91, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांच्या कमी, सुधारीत पैसेवारी 47, सिं. राजा : एकूण गावे 114, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, सुधारीत पैसेवारी 46, मलकापूर : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 69, मोताळा : एकूण गावे 120, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 71, नांदुरा : एकूण गावे 112, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त्‍, सुधारीत पैसेवारी 65, खामगांव : एकूण गावे 145, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 64, शेगांव : एकूण गावे 73, सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 65, जळगांव जामोद : एकूण गावे 119,  सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त, सुधारीत पैसेवारी 54 आणि संग्रामपूर तालुक्यात एकूण गावे 105 असून या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे. तर सुधारीत पैसेवारी 52 आहे.

   तरी जिल्ह्यातील एकूण 1419 गावांपैकी मेहकर, लोणार व सिंदखेड राजा तालुकयातील सर्व एकूण 366 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तसेच उर्वरित तालुक्यांमधील सर्व 1053 गावांची सुधारीत पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त्‍ आहे. संपूर्ण जिल्ह्याची सुधारीत पैसेवारी 59 आहे, असे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी कळविले आहे.   

No comments:

Post a Comment