Monday 12 October 2020

DIO BULDANA NEWS 12.10.2020

जिल्हा न्यायालयातील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी बुलडाणा, (जिमाका) दि. 12 – स्थानिक जिल्हा न्यायालय इमारत व परीसरातील सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेनेचे उद्घाटन आज 12 ऑक्टोंबर रोजी जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा न्यायाधीश 1 आर. बी रेहपाडे, प्रमुख न्यायदंडाधिकारी एन. आर तळेकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर. एम राठोड, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती एस. डी पंजवानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव साजीद आरीफ सैय्यद, न्यायालय व्यवस्थापक श्रीमती सुप्रिया देशमुख व जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व.रा. भारंबे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन म्हणाले, सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे न्यायालयाचे आवारात एक प्रकारचा वचक निर्माण झाला. आवारामध्ये बऱ्याच वेळेस पक्षकाराकडून वकील लोकांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. त्याला आळा बसला. तसेच आवारातील प्रत्येक व्यक्तीवर, कर्मचारी, वाहने आदींवर लक्ष ठेवण्याचे काम चोख बजाविल्या जात आहे. या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरीता जिल्हा नियोजन समिती, बुलडाणा तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून निधी उपलब्ध करण्यात आला होता. याकामी निधी उपलब्ध करून घेण्यापासून ते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापर्यंतचे कामासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालय व्यवस्थापक श्रीमती सुप्रिया देशमुख यांनी प्रयत्न केले. हे काम पुर्णत्वास नेण्यासाठी तत्कालीन जिल्हा नियेाजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा न्यायालयातील संगणक विभागाचे डीएलएसए पी. एन शिंदे व रविंद्र चाकोतकर यांनी सुद्धा योगदान दिले. जिल्हा न्यायालय बुलडाणा व त्याला संलग्न असलेले चिखली, मेहकर, लोणार, शेगांव व मलकापूर येथे जिल्हा नियेाजन समिती तथा जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण योजनेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. हे कॅमेरे एमएसएसआयडीसी, मुंबई यांच्यामार्फत कार्यान्वीत करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. सदर कॅमेरे आजरोजी या सर्व उपरोक्त तालुक्यात पुर्णत: बसविण्यात आले आले असून सध्या कार्यरत आहे. ******* एमपीएससी परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादेची गणना आधीसारखीच सुधारीत कार्यक्रमानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तरतूद बुलडाणा, (जिमाका) दि. 12 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा (पुर्वपरीक्षा) दि. 11 ऑक्टोंबर 2020 रोजी होणार होती. राज्य शासनाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचा सुधारीत कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार सदर सुधारीत कार्यक्रमातंर्गत जाहीर होणाऱ्या परीक्षेसाठी दि. 11 ऑक्टोंबर 2020 रोजी प्रवेश पत्र दिलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेस बसता येणार आहे. तसेच उमेदवारांसाठी वयोमर्यादा गणना करण्याचा दिनांक जाहीरातीनुसार दिनांक 1 एप्रिल 2020 असाच राहणार आहे. त्यामुळे पुढील परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा गणना आधीच्या परीक्षेसारखी असणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे. ****** कोरोना अलर्ट : प्राप्त 294 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 33 पॉझिटिव्ह • 108 रूग्णांना मिळाली सुट्टी बुलडाणा,(जिमाका)दि.12 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 327 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 294 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 33 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपिड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 261 तर रॅपिड टेस्टमधील 33 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 294 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे – मलकापूर शहर : 3,मलकापूर तालुका : दुधलगांव 1, शेगांव शहर : 1, शेगांव तालुका : निंबा 1, माटरगांव 1, खामगांव शहर : 2, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, घाटपुरी 2, मोताळा शहर : 1, लोणार तालुका : रायगांव 1, जळगांव जामोद शहर : 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 2, इस्लामपूर 1, बुलडाणा शहर : 8, मेहकर तालुका : दुधलगांव 1, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 2, पळसखेड चक्का 1, चिखली शहर: 1, चिखली तालुका : गुंजाळा 1, सवणा येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 33 रूग्ण आढळले आहे. तसेच आज 108 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे - बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 7, अपंग विद्यालय 2, नांदुरा : 5, चिखली : 11, लोणार : 18, मेहकर : 9, सिं. राजा: 15, दे. राजा : 16, मोताळा : 8, शेगांव : 4, खामगांव : 9, मलकापूर : 4. तसेच आजपर्यंत 34566 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7503 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7503 आहे. आज रोजी 187 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 34566 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8092 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7503 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 483 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 106 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे. ****** कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करावे कृषि विभागाचे आवाहन बुलडाणा,(जिमाका)दि.12 : गुलाबी बोंडअळी या किडींच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान 29 ते 32 अंश सेल्सीअस व रात्रीचे तापमान 11 ते 14 अंश सेल्सीअस, तर दिवसाची आर्द्रता 71 ते 80 टक्के व रात्री आर्द्रता 26 ते 35 टक्के असणे ही अत्यंत पोषक आहे. सद्यस्थितीत अशाप्रकारचे वातावरण आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. नेहमीप्रमाणे ऑक्टोंबरमध्ये पोषक वातावरण असतेच. तसे ते आताही आहे. कपाशीचे 15 ते 20 दिवसाचे बोंड गुलाबी बोंड अळीचे आवडते खाद्य आहे. या सर्व कारणांमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये 8 ते 10 पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवसथापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकांमध्ये मजुरांच्या सहाय्याने डोमकळ्या अर्थात गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले शोधून नष्ट कराव्यात. तसेच 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझॉडीरेक्टीन 0.03 (300 पीपीएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के (1500 पीपीएम ) 25 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतीनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरून किडके नसलेले एक बोंडे असे 20 बोंडे तोडू ते भुईमुगांच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडक बोंड व अळ्यांची संख्या मोजून, ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढुरक्या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून शिफारशीनुसार रासायनिक किटकनाशकांची फवाणी करावी. थायोकीकार्ब 15.8 टक्के डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेथींन 2.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के अधीक डेल्टामेंथीन 1 टक्के अधिक 17 मिली किंवा क्लोरेंट्रानिलीप्रोल 9.3 टक्के अधिक लँब्डासायहॅलोथीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के अधिक सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के अधिक ॲसीटामोप्रीड 7.7 टक्के 10 मिली या प्रमाणे फवारणी करून कापूस पिकाचे संरक्षक करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. ***** कोविड 19 नियंत्रणासाठी जिल्ह्यातील 28 खाजगी डॉक्टरांची सेवा अधीग्रहीत जिल्हाधिकारी यांचे आदेश बुलडाणा,(जिमाका)दि.12 : जिल्हयातील कोविड 19 रूग्णांची संख्या पाहता शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 28 खाजगी डॉक्टरांची सेवा ऑक्टोंबर महिन्यासाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. सेवा अधिग्रहीत करण्यात आलेल्या डॉक्टरांना दिनांक व वार नेमून देण्यात आला आहे. कोविड 19 या आजाराकरीता सेवा अधिग्रहीत केलेल्या डॉक्टरांनी सेवा उपलब्ध करून न दिल्यास त्यांचे विरूद्ध साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांची नोंदणी रद्द करण्याकरीता इंडियन मेडीकल कॉन्सील व आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस राममूर्ती यांनी कळविले आहे. --

No comments:

Post a Comment