Friday 9 October 2020

DIO BULDANA NEWS 9.10.2020

 माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेचा पहिल्या टप्प्यातील आजचा शेवटचा दिवस

  • राहीलेल्या नागरिकांनी तपासणी करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 9 -  राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणणे व कोविड रूग्ण शोधण्यासाठी माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात आली. मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्यात पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते झाला. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात पहिला टप्पा  15 सप्टेंबर 2020 ते 10 ऑक्टोंबर 2020 राबविण्यात येत आहे. या टप्प्यातील मोहिमेचा 10 ऑक्टोंबर हा शेवटचा दिवस आहे.  तरी मोहिमेदरम्यान तपासणी न झालेल्या नागरिकांनी स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणेमार्फत आपली तपासणी करून घ्यावी व शासनाच्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.  माझे कुटूंब माझी जबाबदारी हो मोहिम ही केवळ शासनाची नसून ती जनतेची आहे. यामध्ये जनतेने स्वत:हून सक्रीय सहभाग घ्यावा. आपल्या कुटूंबाची जबाबदारी घेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

*******

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा अंदाज

  • शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचे संरक्षण करावे

बुलडाणा,(जिमाका)दि.9 : नागपूर वेधशाळेकडून प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यात 9 ते 13 ऑक्टोंबर 2020 दरम्यान परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही भागात 10 ऑक्टोंबर रोजी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 11 व 12 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील अनेक भागात विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. तसेच 13 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील बहुतांश भागात  जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, भारतीय हवामान विज्ञान विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे.

 तरी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची कापणी, मळणी किंवा सोंगणी केली असल्यास त्या पिकांचे संरक्षण करावे. सोयाबीन पिकांच्या सुड्या झाकून ठेवाव्यात. मका, ज्वारी पिकांची कापणी केली असल्यास तात्काळ झाकून ठेवून संरक्षीत करावी. कापसाची वेचणी करून तोसुद्धा सुरक्षीत ठेवावा. कापूस वेचणीस आला असल्यास विनाविलंब कापसाची वेचणी करून घ्यावी. जिल्ह्याच्या वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढले असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पुर्वउपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

******

 

कोरोना अलर्ट : प्राप्त 342 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 55 पॉझिटिव्ह

• 181 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.9 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 397 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 342 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 45 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 237 तर रॅपिड टेस्टमधील 105 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 342 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे – जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : कुरणखेड 1, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : बेलाड 1, नांदुरा शहर : 2, शेगांव शहर : 1, लोणार तालुका : वढव 2, मांडवा 1, चिखला 1, राजणी 1, सरस्वती 2, देऊळगांव कुंडपाळ 1, गुंजखेडा 2,  लोणार शहर : 7, दे. राजा शहर : 1, मोताळा शहर : 1,  मोताळा तालुका : सावरगांव 1, बोराखेडी 1,  बुलडाणा शहर : 12, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 2, सिं. राजा तालुका : रिधोरा 1, चिखली तालुका : गुंजाळा 4, मेरा बु 1,  शेलगांव 1, चिखली शहर : 2, खामगांव शहर : 1 व मूळ पत्ता राजूर जि. जालना येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचारादरम्यान नांदुरा  येथील 72 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 181 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे -  खामगांव : 48, शेगांव :  14, सिं. राजा : 19, दे.राजा : 13, नांदुरा : 20, जळगांव जामोद : 1,  लोणार : 20 , बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 4,  चिखली : 13, मलकापूर : 11, मोताळा : 5, मेहकर : 12, संग्रामपूर : 1.     

   तसेच आजपर्यंत 33588 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 7240 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 7240 आहे.  

  आज रोजी 679 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 33588 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7969 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 7240 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 624 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 105 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

*****


--

No comments:

Post a Comment