Friday 23 October 2020

DIO BULDANA NEWS 23.10.2020

 अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेचे आयोजन

  • इच्छूकांनी 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत अर्ज करावे

बुलडाणा (जिमाका), दि. 23 : केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळ,नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा दरवर्षी आयोजीत केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धासाठी विवीध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेवून स्पर्धांसाठी पाठविले जातात.

            राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या  स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा विवीध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रशायकीय विभागात/ कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेले कार्यालय/विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू/ कर्मचा-यांच्या निदर्शनास सदर बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रीकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटीक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय भारतीय नागरी सेवा स्पर्धेतून ज्या खेळाडू/कर्मचा-यांना भाग घ्यावयाचा असेल (प्रत्येक खेळ प्रकारासाठी स्वतंत्र विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.) त्यांनी दि. 31 ऑक्टोंबर 2020 पुर्वी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा नगरी जांभरून रोड, बुलडाणा येथे संपर्क साधून विहीत नमुण्यातील आवेदनपत्र प्राप्त करून घेवून, दिनांक 10.11.2020 पर्यंत, आवेदन पत्र सुअक्षरात भरुन, आपल्या कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे तीन प्रतीत अर्ज, आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करण्यात यावे , असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी केले आहे.           

*******


प्रधानमंत्री आवास योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा

-          खासदार प्रतापराव जाधव

  • प्रधानमंत्री आवास योजना आढावा बैठक
  • नगरपालिकांनी घरकुलांचा डीपीआर मंजूर करवून घ्यावा
  • डीपीआरनुसार आलेला निधी त्याच उद्दिष्टासाठी खर्च करावा

बुलडाणा (जिमाका), दि. 23 : केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे 2022 हे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासन समन्वयातून प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) राबवित आहे. या योजनेनुसार बेघर, कच्चे घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकूल मिळणार आहे. नगरपालिका नागरी भागातील अंमलबजावणी यंत्रणा आहे. तरी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकूलांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी आज दिल्या आहेत.

    प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत सर्वांसाठी घरे 2022 या उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस राममूर्ती, बुलडाणा कृउबासचे प्रशासक जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.  

   नगरपालिकांनी पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचा पाठविलेला डिपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टसंबधीत वरिष्ठ स्तरावरून मंजूर करवून घेण्याचे सूचीत करीत खासदार श्री. जाधव म्हणाले, डीपीआर पाठविताना त्यामध्ये त्रुटी नसाव्यात. डीपीआर मंजूर झाल्यानंतर तातडीने नगर पालिकांनी संबंधीत लाभार्थ्यांच्या घरकुलांचे सर्वेक्षण करावे. सर्वे करणाऱ्या एजन्सीकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा. जर प्रतीसाद मिळत नसेल, तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच घरकुल जागेच्या मोजण्या पूर्ण कराव्यात. भूमि अभिलेख विभागाने यासाठी पुढाकार घेवून मोजण्या गतीने पुर्ण करून द्याव्यात. जेणेकरून लाभार्थी घरकुलाच्या कामाला सुरूवात करू शकेल. एका घरकुलासाठी 323 स्क्वेअर फुट जागा पाहिजे. त्यानुसार जागेची उपलब्‍ध्‍ाता करून घ्यावी.

 ते पुढे म्हणाले, नगर पालिकांनी घरकुलांचे पात्र लाभार्थ्यांना पहिले इन्स्टॉलमेंट देवून प्राप्त झालेल्या रक्कमेतून दुसरे इस्टॉलमेंट देता येत असल्यास ते द्यावे. जेणेकरून लाभार्थ्याला घरकुलाचे बांधकाम पुर्ण करण्यास मदत होईल. घरकुलांचा पुर्ण निधी मिळण्यासाठी नगरपालिकांनी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करावा. तसेच मंजूर डिपीआरनुसार प्राप्त झालेला निधी त्याच उद्देशासाठी खर्च करावा. पायाभूत सोयी सुविधांसाठीचा निधी अन्यत्र खर्च करू नये. नगर पालिकेतील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामांना नियमानुसार नेहमी सहकार्य करावे.

  मेहकर येथील आयएचडीपी (इंटीग्रीटेड हाऊसिंग डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) अंतर्गत निर्माण करण्यात ओलल्या घरकुलांमधील अवैध लोकांना बाहेर काढून नियमानुसार घरकुले वाटप करण्याची कारवाई करावीर. या घरकुलांमध्ये पात्र लाभार्थी नाहीत. पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार घरकुले द्यावीत. या घरकुलांचा वापर अवैध कामांसाठी होत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. अवैध रित्या राहत असलेल्या नागरीकांना बाहेर काढावे अन्यथा त्यांची दुसरीकडे राहत असलेली घरे जप्त करावी, असे निर्देशही खासदार श्री. जाधव यांनी दिले.  बैठकीचे संचलन नागरी विकास यंत्रणेचे कार्यक्रम अधिकारी श्री. शेळके यांनी केले. बैठकीला सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, म्हाडाचे अधिकारी व संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

                                                                        ***********

   


मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे जंक्शन अपघात प्रवण नसावे

-          खासदार प्रतापराव जाधव

  • रस्ता सुरक्षा समिती बैठक

बुलडाणा (जिमाका), दि. 23 : सध्या जिल्ह्यात बऱ्याच रस्त्यांची कामे सुरू आहे. अनेक रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. राष्ट्रीय, राज्य, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मोठ्या रस्त्यांना ग्रामीण भागातील गाव रस्ते जोडलेले असतात. जिल्ह्यात मात्र ग्रामीण रस्ते मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या जंक्शनच्या ठिकाणी अपघात  प्रवण स्थळ निर्माण झालेले आहे. कंत्राटदारांच्या चुकांमुळे अशा ठिकाणी अपघात घडत आहेत. त्यामुळे मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचे जंक्शन अपघात प्रवण नसावे, असे निर्देश खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत.

   रस्ता सुरक्षा समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना खासदार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस राममूर्ती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, बुलडाणा कृउबासचे प्रशासक जालींधर बुधवत आदी उपस्थित होते.

  ते पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यात काही रस्त्यांची कामे सुरू असून अशा निर्माणाधीन रस्त्यांवर सुरक्षेचे सर्व नियम पाळल्या गेले पाहिजे. रस्ता काम सुरू असताना रस्ता सुरक्षेचे नियम व उपययोजना न केल्यामुळे अपघात होतात. त्यामध्ये नाहक जीव जातो. अशा परिस्थितीत संबंधीत कंत्राटदारांनी रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी यंत्रणांनी लक्ष द्यावे. रस्ता निर्मिती सुरू असताना धुळ न उडण्यासाठी ठराविक कालावधीनंतर पाण्याचा वापर करावा.

    रस्ता कामामुळे खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांची तातडीने संबंधीत यंत्रणांनी डागडुजी करून घ्यावी.  संबंधीत यंत्रणांनी समितीला वेळोवेळी मागितलेले अहवाल उपलब्ध करून द्यावे. अपघात प्रवण स्थळांसाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकयोग्य करावा, अशा सूचनाही खासदार यांनी याप्रसंगी दिल्या. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी माहिती दिली. यावेळी संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

******

कोरोना अलर्ट : प्राप्त 798 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 82 पॉझिटिव्ह

  • 57 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.23: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 880 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 798 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 82 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 64 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 379 तर रॅपिड टेस्टमधील 419 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 798 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव तालुका : निमकवळा 3,  पिं.राजा 1, अटाळी 1, खामगांव शहर : 2, जळगांव जामोद शहर : 5, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 3, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : भोटा 6, लोणार तालुका : वझर आघाव 1, पार्डा 1,पळसखेड 6, गायखेड 1, लोणार शहर : 11, दे. राजा तालुका : दे. मही 1, दे.राजा शहर : 1,  बुलडाणा शहर : 5, बुलडाणा तालुका : हनवतखेड 1, चिखली तालुका : धोडप 1, माळशेंबा 1, खैरव 4, टाकरखेड हेलगा 1, हिवरा 1,  चिखली शहर : 4, मेहकर तालुका : मोळा 1, हिवरा आश्रम 1, गोहेगांव 1, उकळी 1,  मेहकर शहर : 4, संग्रामपूर तालुका : बावनबीर 1,शेगांव शहर : 3, मलकापूर शहर : 5, मलकापूर तालुका : कुंड खु 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 82  रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे शेगांव येथील 65 वर्षीय महिला व घाटपुरी ता. खामगांव येथील 60 वर्षीय महिला रूग्णाचा उपचारादरम्यान खामगांव कोविड रूग्णालयात मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 57 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 4, चुनावाला हॉस्पीटल 13, खामगांव : 9, नांदुरा : 1, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 4, स्त्री रूग्णालय 1, मेहकर : 3,  जळगांव जामोद : 3, लोणार : 2, शेगांव : 1, दे. राजा : 5, मलकापूर : 4, सिं. राजा : 7,   

   तसेच आजपर्यंत 39435 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8107 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8107 आहे. 

  आज रोजी 1583 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 39435 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 8876 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8107 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 650 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 119 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment