Wednesday 28 October 2020

DIO BULDANA NEWS 28.10.2020

 निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी

·        जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.28: राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती धारक, माजी आमदार, इतर राज्य निवृत्ती वेतन धारकांनी माहे नोव्हेंबर 2020 पासून 31 डिसेंबर 2020 पर्यंत बँकेमध्ये जावून विहीत नमुन्यातील हयात प्रमाण पत्रावर स्वाक्षरी करावी. संबधीत बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.  त्या शिवाय त्यांचे माहे जानेवारी 2021 निवृत्ती वेतन काढता येणार नाही, याबाबत कृपया निवृत्ती वेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिनकर बावस्कर यांनी केले आहे.

*****

कोरोना अलर्ट : प्राप्त 553 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 21 पॉझिटिव्ह

  • 51 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.28: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 574 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 553 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 190 तर रॅपिड टेस्टमधील 363 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 553 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : संग्रामपूर तालुका : तामगांव 1, पातुर्डा 3, चांगेफळ 1, बावनबीर 1, शेगांव तालुका: जवळा 1, शेगांव शहर : 3, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : बरफगांव 1,  खामगाव शहर : 3, दे. राजा शहर : 2,  लोणार तालुका : पिंपळनेर 1, लोणार शहर : 1, जळगांव जामोद शहर : 1, मेहकर तालुका : मोळा  येथील 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 21 रूग्ण आढळले आहे. उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे नांद्राकोळी ता. बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.   

      तसेच आज 51 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 1, बुलडाणा : अपंग विद्यालय 6, आयुर्वेद महाविद्यालय 1, सिं.राजा : 3, शेगांव : 11,   नांदुरा : 10, चिखली : 4, लोणार : 8, मलकापूर : 4, दे. राजा : 3,      

   तसेच आजपर्यंत 42917 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8469 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8469 आहे. 

  आज रोजी 2715 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 42917 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9174 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8469 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 583 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 122 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*********

कर्जमाफी योजनेत त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्डची प्रत जमा करावी

  • स्टेट बँक ऑफ इंडियाचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत त्रुटी असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. यादीमध्ये नाव असलेल्या मात्र कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी  संबंधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आपले आधार कार्डची प्रत जमा करावी. जर यादीमधील व्यक्ती मयत झाली असल्यास, मयताचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचे आधार आणि बचत खाते क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संबंधीत शाखेत जमा करावी. आधार प्रमाणीकरण बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर आधार कार्ड व पासबुक घेवून जात आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. तरी त्वरित आधार कार्डची प्रत जमा करावी. अन्यथा कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहील्यास ती जबाबदारी बँकेची राहणार नाही, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने कळविले आहे.

                                                                        **********

सततच्या पावसामुळे बाधित क्षेत्रासाठी सर्व

आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी

-         पालकमंत्री डॉ शिंगणे

बुलडाणा,(जिमाका) दि. 28 :  जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पंचनामे करून तात्काळ मदत करावी असे पत्र  पालकमंत्री ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. याबाबतीत पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पुढाकार घेऊन  शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणे बाबत मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.

   जिल्ह्यात एकूण 7 लक्ष 36 हजार 382 हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. जिल्ह्यात माहे ऑगस्ट मध्ये दि 11 व 12 आणि सप्टेंबर मध्ये दि 11 ते 21 दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मूग व उडीद ही पिके काढणीच्या वेळेसच सतत पाऊस झाला .तसेच  सततच्या पावसाने सोयाबीन पिकाच्या दाण्यास मोड आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जून ते सप्टेंबर या कालावधीत सततच्या पावसाने 98 हजार 537 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, मका, तूर, ज्वारी, ऊस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

   तरी यासंदर्भात प्रशासनास विशेष निर्देश देऊन पंचनामे करण्यासाठी आदेश द्यावेत व बाधित झालेल्या क्षेत्रांसाठी सर्व आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ  मदत देणेबाबत  ना. डॉ राजेंद्र शिंगणे  यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार याना विनंती केली आहे, असे पालकमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                                        *******

                      ग्रामपंचायतींचे प्रभाग रचना व आरक्षण 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार जुलै 2020 ते डिसेंबर 2020 कालावधीत मुदत संपणाऱ्या किंवा नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील नियम 2- अ नुसार प्रारूप प्रभाग रचना, आरक्षणाबाबत नियम 5 मधील पोट नियम (1) च्या नमुना अ अन्वये दिनांक 27 ऑक्टोंबर 2020 पर्यंत  उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाला (नमुना अ मध्ये) मान्यता देवून तहसिलदार, पंचायत समिती कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात 2 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याबाबतची नोंद सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्ष, सर्व लोकप्रतिनिधी तसेच नागरीकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment