Thursday 1 October 2020

DIO BULDANA NEWS 1.10.2020

 हमीभावामध्ये सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरूवात

·         सोयाबीन प्रती क्विंटल 3880 रूपये हमीभाव

·         मूग व उडीदाच्या शासकीय खरेदीला प्रारंभ

·        शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

बुलडाणा, (जिमाका) दि. 1 :  केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेतंर्गत खरीप हंगाम 2020-21 साठी सोयाबीन शेतमालाच्या शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी 1 ऑक्टोंबरपासून सुरू झाली आहे. सोयाबीनला प्रती क्विंटल 3880 रूपये हमी भाव असून नाफेडच्यावतीने मार्केटींग फेडरेशन जिल्ह्यामध्ये सोयाबीनची खरेदी करणार आहे. जिल्ह्यामध्ये तालुका खरेदी विक्री संघ दे. राजा, लोणार, मेहकर, शेगांव, संग्रामपूर, बुलडाणा येथे सोयाबीनची शासकीय खरेदी करण्यात येणार आहे.  

   तसेच मोताळा येथे संत गजानन कृषि उत्पादक कंपनी, साखरखेर्डा ता. सिं. राजा येथे सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी व सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ कृषि विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड ता. दे. राजा खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांची शेती ज्या तालुक्यांमध्ये आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती असलेल्या तालुक्यातीलच खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी जावे. त्याचप्रमाणे 1 ऑक्टोंबर पासून शासकीय मूग व उडीद शेतमालाच्या खरेदीला प्रारंभ करण्यात आला आहे. उडीदाची खरेदी 6000 रूपये प्रति क्विंटल व मूगाची खरेदी 7196 रूपये प्रति क्विंटल आधारभूत किंमतीला सदर खरेदी केंद्रांवर करण्यात येत आहे. उडीद व मूग शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणीसुद्धा सुरू आहे.  तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी शेती असलेल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतमालाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी  लागणारी कागदपत्रे

चालु हंगामातील 7/12 उतारा, पिकपेरा, खाते सुरू असलेले बँकेचे पासबुक झेरॉक्स (जनधन खाते, बंद खाते व कमी लिमीटचे खाते पासबुक झेरॉक्स देवू नये), आधार कार्ड प्रत, सुरू असलेला मोबाईल क्रमांक आदी.

                                                                                                ****************

ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन होणार ई लोकशाही दिन

  • कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे निर्णय
  • मोबाईल क्रमांक 7249093265 वर ऑनलाईन तक्रारी  कराव्यात
  • व्हिडीओ कॉलद्वारे तक्रारदाराशी साधणार संपर्क

बुलडाणा,(जिमाका) दि.1: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात येते.   या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी,नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतात. जर सोमवारला शासकीय सुट्टी असल्यास पुढील दिवशी मंगळवारला आयोजन करण्यात येत असते. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमी व नियमित बस सेवा नसल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा लोकशाही दिन ई- लोकशाही दिन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार 5 ऑक्टोंबर रोजी ई लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  या लोकशाही दिनी तक्रारदारांनी ऑनलाईन पद्धतीने 7249093265 या मोबाईल क्रमांकावर तक्रारी कराव्यात. त्यामुळे तक्रारदारांना लोकशाही दिनाला स्वत: उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. तक्रारदारांनी दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून संपर्क साधण्यात येणार आहे. तक्रारदाराने सदर मोबाईल व्हॉट्सॲप क्रमाकांचे त्याकाळात इंटरनेट सुरू असण्याची खातरजमा करायची आहे.

         तालुका स्तरावरील लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात अर्ज करता येतो. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, विविध न्यायालयात, प्राधिकाऱ्यांकडील, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी 8 दिवसात पाठविण्यात येतील. त्याची एक प्रत अर्जदारास पाठविण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

*****

                अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातीन स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा

बुलडाणा,(जिमाका) दि.1:  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यीता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना राबविण्यात येते. त्यानुसार देण्यात येणाऱ्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज सर्व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावे. बचत गटांनी आपली 10 टक्के रक्कम मिळून मंजूर अनुदानामधून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने मंजूर केलेल्या कोणत्याही डिलरकडून सर्व चौकशी व तपासणी करून घेण्यात यावी.

   सदर योजनेकरीता कोणत्याही बाह्यव्यक्तीची नेमणूक केलेली नाही तथा कोणत्याही बाह्य व्यक्तीशी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा यांचा कोणताही संबंध नाही. कोणत्याही स्वयं सहाय्यता बचत गटाने व त्यांच्या कोणत्याही सदस्याने परस्पर बाह्यव्यक्तीने सदर योजनेबद्दल कोणताही व्यवहार उघड केल्यास व त्यात फसवणूक झाल्याचे उघड झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. अनुसूचित जाती व नवबौद्ध घअकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना अंतर्गत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अर्ज सदर कार्यालयात आवज जावक शाखेत सादर करावे. या योजनेसंबंधी कोणत्याही माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा व सदर योजनेचे समाज कल्याण निरीक्षक यांच्याशीच संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

                                                            *******  

कोरोना अलर्ट : प्राप्त 361 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 103 पॉझिटिव्ह

• 76 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.1 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 464 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 361 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 103 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 88 व रॅपिड टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 238 तर रॅपिड टेस्टमधील 123 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 361 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  मेहकर तालुका : कनका 8, नागझरी 4, डोणगांव 7, ब्रम्हपूरी 4,   मेहकर शहर : 7, सि. राजा तालुका : साखरखेर्डा 3, राहेरी 2, पिंपळगांव ठोसर 2, दुसरबीड 1, लोणार तालुका : वडगांव तेजन 3, पळसखेड 1, खळेगांव 1,वढव 3, राजणी 4,  लोणार शहर : 2, दे. राजा शहर : 6, दे. राजा तालुका : दे. मही 3, पाडळी शिंदे 1, नारायणखेड 1,   चिखली तालुका : अमडापूर 1, सातगांव भुसारी 1, धोत्रा भणगोजी 1, मोताळा तालुका : धा. बढे 2, नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : नवी येरळी 1, येरळी 3, वडी 1,  शेगांव शहर : 9, शेगांव तालुका : झाडेगांव 1, सांगवा 1, खामगांव शहर : 5, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 1, बुलडाणा शहर : 3  संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 103 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मोताळा येथील 82 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 76 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  मलकापूर : 14, बुलडाणा : स्त्री रूग्णालय 3, खामगांव : 29, शेगांव : 14, नांदुरा : 13, चिखली : 3.

   तसेच आजपर्यंत 30661 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 6053 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 6053 आहे.  

  आज रोजी 892 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 30661 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 7288 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 6053 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1140 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 95 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 


No comments:

Post a Comment