Monday 26 October 2020

DIO BULDANA NEWS 26.10.2020

 


मोजणीतून सुटलेल्या घरांचा मोबदला देण्यात यावा

-         पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

 

  • जुनी येरळी गावातील जिगांव प्रकल्पग्रतांना न्याय द्यावा
  • पुनर्वसनासाठी आवश्यक असणारी जमिन उपलब्ध करून घ्यावी

बुलडाणा,(जिमाका) दि.24:  जिगांव प्रकल्पासाठी टप्पे निहाय भूसंपादन व पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. या प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला विहीत पद्धतीनुसार भुसंपादन केल्याचा मोबदला मिळाला आहे. प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात येणारे व पुनर्वसन करावे लागणारे जुनी येरळी हे मोठे गाव आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे. संयुक्त मोजणीतून सुटलेल्या घरांचा मोबदला यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून विहीत कालमर्यादेत देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

    जिगांव प्रकल्पातील जुनी येरळी गावातील घरांच्या मोबदल्यासंदर्भातील विविध विषयासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूरचे आमदार राजेश एकडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उप जिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. तर सभागृहात जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, उप जिल्हाधिकारी भुषण अहीरे, उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आदी उपस्थित होते.  

  मोबदला देताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, गावात मोजणीत सुटलेल्या घरांची तातडीने मोजणी करावी. भूमि अभिलेख विभागाने यासाठी आवश्यक ती कार्यवाही  तातडीने करावी. अशा घरांसाठी सरळ खरेदीने भूसंपादन करून विहीत कालमर्यादेत प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यात यावी. यंत्रणांनी समन्वयाने काम करीत तातडीने प्रस्ताव सादर करावे. अतिक्रमीत घरांसाठी यापूर्वी एखाद्या प्रकल्पामध्ये दिलेल्या मोबदल्याची प्रकरणे तपासावी. त्यानुसार कारवाई करावी. तसेच अशा घरांचे भूसंपादन सरळ खरेदी मार्गाने करण्यात यावे.  

  ते पुढे म्हणाले, बांधकाम क्षेत्रफळ शून्य आलेल्या घरांबाबत वेगळी चौकशी लावण्यात यावी. अशा घरांबाबत मोबदल्यासाठी तातडीने सरळ खरेदीचा प्रस्ताव सादर करावा. मोबदल्यासाठी झाडांची सध्याची परिस्थिती व संयुक्त मोजणी अहवालातील मुल्यांकन त्यानुसार योग्य निर्णय घेवून मुल्यांकन करावे. तसेच भूसंपादन झालेल्या बुडीत क्षेत्रातील घरांचा मोबदला दिवाळीपूर्वी देण्यात यावा. येरळी हे पहिल्या टप्प्यातील गाव असल्यामुळे पुनर्वसन करण्यात आलेल्या जागेवर प्लॉट वाटप करावे. जमिनीची आवश्यकता असल्यास पर्यायी जमिनीची व्यवस्था करून ठेवून ती उपलब्ध करून घ्यावी. यावेळी संबंधीत गावातील सरपंच, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

                                                                        ******    

अनुसूचीत जमातीच्या बांधवांना खावटी अनुदान योजनेचा लाभ द्यावा

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

  • खावटी अनुदान योजना आढावा बैठक

बुलडाणा,(जिमाका) दि.24:  शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरीकांना अर्थसहाय्य देणाऱ्या खावटी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरीक, आदिवासी बांधवांना लाभ देण्यात येतो. तरी यंत्रणांनी तातडीने याबाबत आदिवासी बांधवांना योजनेचा लाभ द्यावा, अशा सूचना  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

    खावटी अनुदान योजनेबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री आढावा घेताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

  योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण व्यवस्थित करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा. योजना ही कोरोना संसर्ग पार्श्वभूमीमुळे राबविण्यात येत आहे. त्यामुळे गांभीर्य लक्षात घेवून योजनेचा लाभ पात्र शेवटच्या घटकाला देण्यात यावा. हा समाज अजूनही अज्ञानी व अशिक्षीत आहे. आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्यांना हेदेखील कळत नाही. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून काम होत आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून समाज उत्थानासाठी वेगळे बजेटची तरतूद असते. या योजनेच्या लाभाबाबत समाजात जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी समाजातील सुशिक्षीत युवकांच्या चमू तयार कराव्यात.

    ते पुढे म्हणाले, आदिवासी भागात असणाऱ्या दवाखान्यांमध्ये नियमित डॉक्टर देण्यात यावे. जेणेकरून आरोग्य सुविधेसाठी लांबवर जाण्याची गरज पडणार नाही. वनहक्क पट्टे वाटप संदर्भात विहीत कालमर्यादा आखून कारवाई करावी. तसेच लाभ देण्यासाठी संबंधीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष शिबिरे आयोजित करावी. त्यामध्ये आदिम समाजाचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात यावेत.

  यावेळी उपविभागीय अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व आदिवासी समाजातील मान्यवर, संबंधीत यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                    ******

कोरोना अलर्ट : प्राप्त 685 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 55 पॉझिटिव्ह

  • 64 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.24: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 740 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 685 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 55 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 620 तर रॅपिड टेस्टमधील 65 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 685 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 6, खामगांव तालुका : गोंधनपूर 4,  बुलडाणा शहर : 7, बुलडाणा तालुका : सातगांव म्हसला 1, चांडोळ 2,  मेहकर शहर : 1, मोताळा शहर : 3,  मोताळा तालुका : पिंपळगांव 1, वाघजई 1, जयपूर 2, लोणार शहर : 3, लोणार तालुका : गायखेड 1,  नांदुरा तालुका : टाकरखेड 1, चिखली तालुका : खैरव 2, कोलारा 1,  चिखली शहर : 5, सिं. राजा तालुका : रूम्हणा 5, सिं.राजा शहर : 1, पळसखेड चक्का 1, जळगांव जामोद शहर : 2, जळगांव जामोद तालुका : आसलगाव 2, दे. राजा शहर : 3   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रूग्ण आढळले आहे. 

      तसेच आज 64 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : दे.राजा : 4, मेहकर : 5, सिं. राजा : 10, मलकापूर : 11, शेगांव : 12, मोताळा : 2, खामगांव : 6, बुलडाणा : अपंग विद्यालय 13, स्त्री रूग्णालय 1.   

   तसेच आजपर्यंत 41645 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 8369 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 8369 आहे. 

  आज रोजी 2125 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 41645 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 9055 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 8369 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 565 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 121 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*********

 

दक्षता जागरूकता सप्ताहाचे आयोजन

बुलडाणा,(जिमाका) दि.24:  केंद्रीय दक्षता आयोगाच्या सुचनेनुसार सर्वत्र दक्षता जागरूकता सप्ताहाचे आयोजन 27 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात येत आहे. या कालावधीत भ्रष्टाचार विरोधातील कारवाई संबंधी नागरीकांना संपर्क साधून माहिती देण्यात येणार आहे. तसेच शासकीय कार्यालयांचे ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी घोषवाक्याचे बॅनर्स, स्टीकर्स लावण्यात येणार आहे.

   शासनाचे सर्व विभाग, शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या सर्व संस्था व शैक्षणिक संस्था या सर्व शासकीय कार्यालये तसेच अन्य सर्व महामंडळे, सहकारी पतसंस्था आदींविरोधात भ्रष्टाचाराबाबतची तक्रार करता येते. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारी मार्गाने अधिकारी, कर्मचारी यांनी बेहीशोबी संपत्ती जमविण्याची तक्रारही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करता येते. तक्रार दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हतेची पडताळणी केल्यानंतर कार्यवाही करण्यात येते. तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते.

    जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जागरूकता करण्याच्या उद्देशाने भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी बाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा कार्यालयात किंवा 07262-242548, टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांनी केले आहे.

 

************

No comments:

Post a Comment