शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शेताच्या बांधावर ; शेतकऱ्यांना भरीव मदत देणार – मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील

 











 

 • चिखली व सिंदखेडराजा तालुक्यातील बाधित गावांना पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट

 

 • एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; प्रशासनाला निर्देश

 

बुलढाणा, दि. 24 (जिमाका) : पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि त्यामुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर पोहोचून पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी तातडीने अचूक पंचनामे पूर्ण करावेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी चिखली तालुक्यातील केळवद, मौजे मालगणी, बेराळा, वसंतनगर व सरंबा, तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे शेताच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत पावसातील खंड, पिकांची सद्यस्थिती, उत्पादनावर होणारा परिणाम तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली.

 

जिल्ह्यातील पीक परिस्थिती व नुकसानीचा प्रशासकीय यंत्रणेकडून आढावा घेण्यात आला असून, त्याआधारे शासनस्तरावर लवकरच मदतीबाबत निर्णय होईल, असे ना. मकरंद पाटील यांनी सांगितले. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच उपलब्ध पाणीसाठ्याचा सिंचनासाठी योग्य वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.

 

खडकपूर्णा धरणातील पाणीसाठ्याची पाहणी

 

दौऱ्यादरम्यान सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणाचीही पालकमंत्र्यांनी पाहणी केली. धरणातील सद्य पाणीपातळी, उपलब्ध पाणीसाठा तसेच सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. पिण्याच्या पाण्याचे आवश्यक आरक्षण करून उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन व आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यावेळी आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवळे, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर