कृषी विभागाकडून फळबाग वाचवण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी

 


बुलढाणा, दि. १५ (जिमाका) : दीर्घ जीवनचक्र असलेल्या फळपिकांवर हवामान बदलाचा आणि विशेषतः ‘अल-निनो’चा अत्यंत गंभीर परिणाम दिसून येत आहे. पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे झाडांची अन्ननिर्मिती मंदावणे, वाढ खुंटणे, फुलगळ व फळगळ होणे, तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढून फळांची गुणवत्ता खालावणे अशा अनेक आव्हानांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांनी फळबागांचे संरक्षण करण्यासाठी आणि उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी विशेष व्यवस्थापन पद्धतींचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

 

कृषी विभागाने फळबाग उत्पादकांसाठी सुचविलेले मुख्य व्यवस्थापन उपाय खालीलप्रमाणे आहेत:

 

पाण्याचे कार्यक्षम नियोजन: ठिबक व भूमिगत सिंचन: उन्हाळ्यात थेट मुळापाशी ठिबक किंवा भूमिगत सिंचनाने पाणी द्यावे. यामुळे पाण्याचा अपव्यय टळून खतमात्रा देणे सुलभ होते व खर्चात बचत होते.

 

           सिंचनाची वेळ: पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा आणि झाडांना तापमानाचा झटका बसू नये यासाठी सकाळी ९.०० पूर्वी किंवा सायंकाळी ६.०० नंतरच सिंचन करावे.

 

           अल्टरनेट ड्रिप व सरी पद्धत: तीव्र टंचाई असल्यास एका दिवशी झाडाच्या एका बाजूला व दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूला पाणी द्यावे. मुबलक पाणी असल्यास पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर वाढवावे (उदा. १० ऐवजी १२ ते १५ दिवस).

 

बाष्परोधक व उन्हापासून संरक्षण

 

 बाष्परोधक फवारणी: पानांमधून होणारे ९५% पर्णोत्सर्जन रोखण्यासाठी फिनील मरक्युरी ॲसिटेट, ॲबसिसिक ॲसिड, केओलीन (५%) किंवा सिलिकॉन आधारित बाष्परोधकांची फवारणी करावी.

           बोर्डो पेस्टचा वापर: उन्हामुळे खोड तडकण्यापासून वाचवण्यासाठी जमिनीपासून १ ते २ मीटर उंचीपर्यंत १०% बोर्डो मिश्रणाचा मुलामा किंवा पांढरा चुना लावावा.

 

           सावली व आच्छादन: लहान झाडांना शेडनेट किंवा गवताची सावली करावी. बाष्पीभवन रोखण्यासाठी जमिनीवर १२ ते १५ सेंमी जाडीचे सेंद्रिय आच्छादन (पालापाचोळा, उसाचे पाचट, काड) किंवा पॉलिथीन फिल्मचा वापर करावा.

 

अन्नद्रव्य व पीक छाटणी

 

 सेंद्रिय खते व फवारणी: नत्रयुक्त खतांचा वापर टाळून शेणखत, गांडूळ खत, पोटॅश आणि सिलिकॉनचा पुरवठा वाढवावा. ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (KNO) ५-१० ग्रॅम व विद्राव्य DAP २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

           छाटणी व विरळणी: सुकलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात. तसेच झाडावरील ताण कमी करण्यासाठी अतिरिक्त लहान फळांची विरळणी करावी.

 

फळपिकनिहाय विशेष सल्ला

 

 आंबा: लहान झाडांना सावली करून खोडाला चुना लावावा व बुंध्याभोवती उसाच्या पाचटाचे आच्छादन करावे.

           डाळिंब: काओलीन (५%) ची फवारणी करावी आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसारच मृग बहार धरावा.

           लिंबूवर्गीय पिके (संत्रा, मोसंबी, लिंबू): फळगळ रोखण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड (GA3) ची फवारणी करावी व बागेत आच्छादन वापरावे.

 

अल-निनोच्या या तीव्र संकटाचा सामना खंबीरपणे आणि शास्त्रीय तंत्रज्ञानाचा वापर करून करण्याचे आवाहन कृषी विभागाने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर