बुलढाणा जिल्ह्यात १६ सप्टेंबरपासून 'एफएलसी व सहवासित कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम' सुरू; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि. 16 : महाराष्ट्र
शासनाच्या आदेशानुसार व केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बुलढाणा जिल्ह्यात
१६ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आरोग्य विभागातर्फे "एफएलसी व
सहवासित कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम" (Focused Leprosy Campaign) राबवण्यात येत
आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नुकतीच जिल्हा स्तरावर
एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. जिल्हा परिषद बुलढाणा येथील अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित या कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक संचालक
कुष्ठरोग कार्यालय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. याच धर्तीवर
तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समुदाय स्तरावरही सर्व आरोग्य सेवीका, आशा
सेवीका व स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि स्वरूप:
घरोघरी शारीरिक तपासणी: प्रशिक्षित पथकांद्वारे निवडक
गावांमधील लोकसंख्येची घरोघरी जाऊन १४ दिवसांच्या कालावधीत शारीरिक पाहणी व तपासणी
केली जाईल.
- जनजागृती आणि दवंडी:
प्रत्येक गावात दवंडी देऊन, कुष्ठरोगाचे बॅनर लावून तसेच शाळा, अंगणवाडी,
महिला मंडळ, बचत गट व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने व्यापक जनजागृती केली
जाणार आहे.
- निःशुल्क उपचार:
कुष्ठरोग हा उपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. सर्व शासकीय
दवाखान्यांमध्ये यावरील उपचार मोफत उपलब्ध आहेत.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन:
संशयित रुग्णांचा शोध घेऊन जिल्हा कुष्ठमुक्त करण्याच्या दृष्टीने
ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या शरीरावर कोणताही चट्टा किंवा गाठ असल्यास
आरोग्य पथकाकडून तिची निश्चित तपासणी करून घ्यावी. सर्व नागरिकांनी घरी येणाऱ्या
आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि पथकाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन
आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment