इ.मा.ब.क. विभागाच्या योजनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज मागविले आधार प्रमाणीकरणातील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाइन अर्जाची सुविधा
बुलढाणा, दि. २१ (जिमाका)
: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इतर मागास वर्ग
(OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (VJNT/NT) आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) विद्यार्थ्यांसाठी
विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. ऑनलाइन पोर्टलवर आधार प्रमाणीकरणासह काही
तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडथळे येत आहेत.
पात्र विद्यार्थी योजनांच्या
लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना
ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांनी
दिले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज इतर मागास
बहुजन कल्याण कार्यालय, बुलढाणा येथे सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक दत्तात्रय
वाघ यांनी केले आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेसाठी ऑफलाइन अर्ज सादर करणे
आवश्यक आहे. तसेच तालुकास्तरावरील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या NT-C प्रवर्गातील
विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी, तर OBC, VJNT व SBC प्रवर्गातील
विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करावा.
विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची
प्रतीक्षा न करता आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. अर्जासंदर्भात अडचण अथवा अधिक
माहितीसाठी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बुलढाणा जिल्हा कार्यालय, सामाजिक
न्याय भवन, त्रिशरण चौक, बुलढाणा येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment