सेवा संकल्प अभियान’अंतर्गत बुलढाण्यात २९ सप्टेंबरला 'रोजगार महाकुंभ'; एकाच दिवशी १३ केंद्रांवर भरती मेळावे

 

 

बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कार्यकाळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी 'पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे' आयोजन करण्यात आले आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'रोजगार महाकुंभ महाराष्ट्र' अंतर्गत रोजगार मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील १३ विविध तालुक्यांमधील केंद्रांवर एकाच दिवशी सकाळी ८ ते ६ या वेळेत हे मेळावे पार पडणार आहेत. या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित आस्थापना आणि कंपन्यांमधील रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार संबंधित आस्थापनांशी थेट संवाद साधून रोजगाराची संधी मिळवता येईल.

मेळाव्याची प्रमुख ठिकाणे :

१. नांदुरा: श्री पुंडलीक महाराज महाविद्यालय

२. मोताळा:केबीजे आयटीआय (KBJ ITI), बोराखेडी

३. सिंदखेड राजा: राजमाता पॅरामेडिकल कॉलेज

४. बुलढाणा: मॉडेल डिग्री कॉलेज

५. चिखली: श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय

६. मेहकर: एमईएस (MES) कला आणि वाणिज्य महाविद्यालय

७. लोणार: भगवान बाबा महाविद्यालय

८. मलकापूर: जनता कला वाणिज्य महाविद्यालय

९. जळगाव जामोद: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय

१०. खामगाव: शासकीय पॉलिटेक्निक

११. खामगाव: सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस

१२. शेगाव: सरस्वती कॉलेज

१३. देऊळगाव राजा: श्री व्यंकटेश कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय

 

२१ ते २४ सप्टेंबर दरम्यान मोफत सॉफ्ट स्किल प्रशिक्षण: रोजगार महाकुंभचा अधिकाधिक लाभ युवकांना व्हावा याकरिता २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक तालुक्यातील शासकीय आयटीआय (ITI) येथे विनामूल्य 'सॉफ्ट स्किल प्रशिक्षणाचे' आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवारांना मुलाखत कशी द्यावी आणि प्रभावी रिज्युमे (Resume) कसा तयार करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जात आहे.

 

जिल्ह्यातील अधिकाधिक उद्योजक व आस्थापनांनी आपल्याकडील रिक्त पदांची माहिती विहित नमुन्यात सादर करावी, तसेच सर्व नोकरीइच्छुक उमेदवारांनी पूर्व-प्रशिक्षणाचा लाभ घेऊन २९ सप्टेंबर रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर