जिल्हास्तरीय समन्वय व शांतता समिती सभा संपन्न ; शांततेची परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव उत्साहात साजरा करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

 






जिल्हास्तरीय समन्वय व शांतता समिती सभा संपन्न ;

शांततेची परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव उत्साहात साजरा करा

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

 

बुलढाणा, दि. ४ (जिमाका) : गणेशोत्सव हा आनंद आणि मांगल्याचा उत्सव असून, जिल्ह्यातील शांततेची परंपरा कायम ठेवत यंदाचा गणेशोत्सव सकारात्मक वातावरणात उत्साहाने व आनंदाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.

 

येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय व शांतता समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात झाली. यावेळी आमदार श्वेता महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, बुलढाणा नगराध्यक्ष पूजा गायकवाड, चिखली नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी, शांतता समिती व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले की, गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडण्यासाठी प्रमुख मिरवणूक मार्गांची पाहणी करून आवश्यक त्रुटी दूर कराव्यात. संबंधित विभागांवर सोपविलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात. यासाठी सर्व विभागाने समन्वय व योग्य नियोजन करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून तरुणांना मार्गदर्शन व समुपदेशन करावे. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महसूल विभागामार्फत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वीज, पाणी व स्वच्छतेशी संबंधित कामे तातडीने पूर्ण करावीत. गणेशोत्सवाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

            आमदार श्वेता महाले म्हणाले की, गणेशोत्सव हा सर्वांनी एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्याचा उत्सव आहे. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व धर्मीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि गणेश मंडळांनी परस्पर सहकार्य व समन्वय ठेवून गणेशोत्सव उत्साहात, शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले.

 

उत्सवाच्या काळात तरुणांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी कायद्याचे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. यासाठी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाजातील ज्येष्ठांनी तरुणांना योग्य मार्गदर्शन करावे. कोणत्याही कारणातून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.  तसेच गणेशोत्सव काळात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्यांचे आयोजन केले जाते. भंडाऱ्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही आमदार श्वेता महाले यांनी दिल्या.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह बाबींना स्थान देऊ नये, ध्वनिप्रदूषणाबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी आणि पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे सांगितले. पोलीस प्रशासन, महसूल विभाग, स्थानिक प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांनी समन्वयाने उत्सव साजरा करावा. यासाठी गणेश मंडाळनी सुक्ष्म नियोजन करावे.  नागरिकांच्या सहकार्यामुळे यापूर्वीही जिल्ह्यात शांतता राखण्यात यश आले आहे. उत्सव साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळांना ‘गणराया पोलीस मित्र’ पुरस्कार पोलीस व प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी दिली.

 

महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने यंदा पोलीस, महसूल आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. गतवर्षी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एकूण १,६८० सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन झाली होती. यंदा सुमारे १,६७३ सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन होण्याची शक्यता आहे. तसेच ‘एक गाव, एक गणपती’ मोहिमेत २७२ गावांचा सहभाग राहणार आहे.

 

सभेदरम्यान शांतता समितीचे पदाधिकारी व गणेश मंडळांच्या सदस्यांनी विविध सूचना व मते मांडली. प्रशासन आणि गणेश मंडळांच्या समन्वयातून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या