गणरायाच्या दर्शनासोबत रोजगाराची दिशा; ‘लोकसंवाद-२०२६’मधून उद्योग-स्वयंरोजगार योजनांचा जागर

 





जळगाव जामोद येथील मयुरेश्वर गणेशोत्सव मंडळात युवकांना CMEGP, PMEGPची माहिती

 

बुलढाणा, दि. २१ (जिमाका) : गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र आलेल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या स्वयंरोजगाराच्या योजना पोहोचविण्याचा उपक्रम जळगाव जामोद येथील मयुरेश्वर गणेशोत्सव मंडळात राबविण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना, सुविधा आणि उपक्रमांची माहिती देत युवकांना उद्योग-व्यवसायाच्या संधींची दिशा देण्यात आली.

 

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळे ही नागरिकांशी थेट संवाद साधण्याची प्रभावी केंद्रे ठरत असून, या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.

 

यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाण्याचे व्यवस्थापक एन. एस. पाटील यांनी उपस्थित युवक व नागरिकांना मार्गदर्शन केले. ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP) आणि ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) या योजनांद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेता येतात, याबाबत त्यांनी माहिती दिली. योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क करण्याच्या पद्धतीची माहितीही त्यांनी दिली.

 

दर्शनाच्या निमित्ताने संवाद आणि संवादातून योजनांचा जागर, या संकल्पनेमुळे कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना आणि उद्योग उभारणीसाठी मिळणाऱ्या सुविधांची माहिती गणेशोत्सव मंडळाच्या परिसरातच मिळाल्याने उपस्थित युवक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एन. एस. पाटील, मयुरेश्वर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पात्र युवक व नागरिकांनी शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती घेऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर