गणेशोत्सवात ‘सेवांचा जागर’; टपाल, विमा, आधार आणि आरोग्यसेवा एकाच छताखाली
२१ सप्टेंबरला खामगावात ‘गणपती नाईट कॅम्प’; ‘लोकसंवाद-२०२६’अंतर्गत
विशेष आयोजन
बुलढाणा, दि. १९ (जिमाका) : गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळांना भेट देणाऱ्या नागरिकांना आता विविध शासकीय
आणि टपाल सेवांचा लाभ एकाच ठिकाणी घेता येणार आहे. टपाल सेवा, विमा, बचत योजना, आधार
सेवा, डिजिटल बँकिंग, आरोग्य तपासणी तसेच कृषी आणि महसूल विभागाच्या योजनांची माहिती
उपलब्ध करून देण्यासाठी बुलढाणा डाक विभागातर्फे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी
सायंकाळी ७ वाजता खामगाव येथील वंदेमातरम गणेशोत्सव मंडळात ‘गणपती नाईट कॅम्प’ आयोजित
करण्यात आला आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’
म्हणून घोषित केले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना
आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत
‘लोकसंवाद-२०२६’ ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून
जिल्हा माहिती कार्यालय आणि बुलढाणा डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा विशेष
उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कॅम्पमध्ये स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट,
पार्सल बुकिंग तसेच आंतरराष्ट्रीय टपाल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांना
टपाल विभागाच्या विविध सेवांची माहिती व प्रत्यक्ष सेवेचा लाभ यावेळी घेता येईल. तसेच पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक (POSB) खाती, पोस्टल
लाइफ इन्शुरन्स (PLI) आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) योजनांची नोंदणी व मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. तसेच UPIद्वारे विमा हप्ता भरणे आणि डिजिटल बँकिंग व्यवहारांचे
प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले आहे.
आधार सेवा, आरोग्य तपासणी आणि शासकीय योजनांची माहिती
कॅम्पच्या ठिकाणी आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाची
सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी
व समुपदेशन केले जाणार असून, कृषी आणि महसूल विभागाच्या विविध शासन निर्णयांची व योजनांची
माहितीही देण्यात येणार आहे.
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर आपल्या घरचा गणेशोत्सव नोंदवा
महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे
डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’
(www.bappa.org) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या
परंपरा, आठवणी, माहिती आणि छायाचित्रांची नोंद या माध्यमातून करावी. यासाठी +91
91361 72681 या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवून किंवा Bappa.org संकेतस्थळावर तसेच
क्यूआर कोडच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात
उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले
आहे.
गणपती नाईट कॅम्पमध्ये डाक विभागाचे
अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या शंकांचे निरसन करतील तसेच उपलब्ध
सेवांबाबत आवश्यक मार्गदर्शन करतील. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक
तसेच सर्व नागरिकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता वंदेमातरम गणेशोत्सव मंडळ,
खामगाव येथे आयोजित ‘गणपती नाईट कॅम्प’ला भेट देऊन उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा माहिती कार्यालय आणि बुलढाणा डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000

Comments
Post a Comment