बुलढाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
बुलढाणा, दि. 23 (जिमाका) : बुलढाणा शहर परिसरातील जंगलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला
आहे. या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, नागरिकांनी ओळख पटविण्यासाठी बुलढाणा
शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनरक्षक
समाधान विक्रम साठे (वय ४३) हे १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा वर्तुळातील वनरक्षक व
वनमजुरांसह जंगल गस्त घालत होते. रात्री सुमारे ११.३० वाजता जंगलातील एका ठिकाणी झाडाला
भगव्या रंगाचा रुमाल अडकलेला दिसल्याने त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी
मानव जातीच्या सदृश हाडांचा सांगाडा आढळून आला.याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना
माहिती दिल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा
करून मर्ग क्रमांक ०४/२०२५, कलम १७४ बीएनएसएस अन्वये नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार, मृत व्यक्तीच्या अंगावर कोणतेही
कपडे नव्हते. बाजूला हिरव्या-काळ्या रंगाची ट्रॅक पँट, NIKE कंपनीचे निळे पट्टे असलेले
कपडे, निळसर रंगाचे शर्ट आदी वस्तू आढळल्या आहेत. मृत व्यक्तीचा सांगाडा व हाडे कुजलेल्या
अवस्थेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास
किंवा ओळख पटत असल्यास बुलढाणा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी
सहायक पोलीस निरीक्षक एम. जी. वाघमोडे यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment