दुष्काळाच्या संभाव्य स्थितीवर जिल्हास्तरीय आढावा; पीक पेरा नोंदी, पाणी व चारा टंचाईचे सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

 





 

बुलढाणा, दि. २२ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मधील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून पाणी, चारा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पूर्वनियोजन करावे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य व मदत मिळेल, यासाठी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

 

संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या मूल्यमापनाबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 

पीक विमा प्रतिनिधी, कृषी विभागाचे अधिकारी आणि तालुका स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून १०० टक्के पीक पेरा नोंदी तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले. तलाठी, ग्रामसेवक व संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची अचूक नोंद करावी. या कामावर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी नियमित देखरेख ठेवावी.

 

शेतातील पिकांची काढणी सुरू होण्यापूर्वी पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी. शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणीचे महत्त्व समजावून सांगून त्यांना आवश्यक सहकार्य करावे. ई-पीक पाहणीच्या नोंदी अचूक असल्याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. तलाठी स्तरावर प्रलंबित असलेल्या ई-पीक पाहणी नोंदींची तातडीने तपासणी करून त्या मंजूर कराव्यात. या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्यासाठी प्राधान्याने पाणी आरक्षित करावे. तालुक्यातील उपलब्ध विहिरी व अन्य पाणीस्रोतांची पाहणी करून त्यांची स्थिती तपासावी. जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करावे. पाणी व चारा उपलब्धतेच्या ठिकाणांची नियमित पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात.

 

संकटग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांना शासनाच्या उपलब्ध उपाययोजनांचा लाभ मिळवून द्यावा. आगामी काळातील संभाव्य परिस्थितीचा विचार करून ग्राम, तालुका व जिल्हास्तरावर पाणीटंचाईचे सूक्ष्म नियोजन करावे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून पाणी आरक्षण, चारा उपलब्धता आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबत सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी दिले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर