चिखली तालुक्यात २५ सप्टेंबरपासून खत विक्रीची नवीन FFS प्रणाली लागू
बुलढाणा, दि. 23 (जिमाका) : खत वितरणात पारदर्शकता आणणे, खतांचे लिंकिंग व काळाबाजाराला आळा
घालणे तसेच शेतकऱ्यांना योग्य वेळी व योग्य प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यासाठी ‘फ्रेमवर्क
फॉर फर्टिलायझर सेल (FFS)’ ही नवीन खरेदी-विक्री प्रणाली बुलढाणा जिल्ह्यात २५ सप्टेंबर
२०२६पासून लागू करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर चिखली तालुका कृषी अधिकारी
कार्यालयात २१ सप्टेंबर रोजी सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकाऱ्यांचे,
तर २२ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. गावपातळीवर
शेतकरी सभा घेऊन FFS अॅप डाऊनलोड करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना
देण्यात आल्या आहेत. नवीन प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना मोबाईलवरून घरबसल्या खताची बुकिंग
करावी लागणार आहे. बुकिंगनंतर उपलब्ध होणारा QR कोड स्कॅन केल्यानंतरच खत विक्री करता
येणार आहे. बुकिंग केल्यानंतर पुढील तीन दिवसांत संबंधित खत खरेदी करता येणार आहे.
DAP व युरियासाठी हेक्टरी कमाल मर्यादा
FFS प्रणालीद्वारे संतुलित खत वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आणि खतांचा तुटवडा रोखण्यासाठी
प्रति हंगाम कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार DAP खताची हेक्टरी कमाल
२ बॅग, तर युरियाची हेक्टरी कमाल ५ बॅग खरेदी करता येणार आहे. खत विक्रेत्यांसाठी
IFMS माहिती अद्ययावत करणे अनिवार्य
सर्व घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांनी IFMS (Integrated
Fertilizer Monitoring System) पोर्टलवर खत परवाना व कार्यरत ठिकाणाची माहिती तातडीने
अद्ययावत करणे आवश्यक आहे. परवाना नूतनीकरण झालेला असूनही IFMS वर माहिती अपडेट नसल्यास
ती त्वरित अद्ययावत करून घ्यावी. माहिती वेळेत अपडेट न केल्यास आगामी DBT प्रणालीमध्ये
PoS मशीनद्वारे खत विक्री करता येणार नाही, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
यासाठी वैध खत परवाना प्रत, पॅन कार्ड,
ओळखपत्र तसेच अक्षांश-रेखांशासह GPS फोटो ही कागदपत्रे दोन दिवसांत संबंधित कंपनीचे
LFS प्रतिनिधी किंवा कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल सुविधा FFS Mobile App मुळे शेतकऱ्यांना
हवे ते खत, हवे त्या दुकानातून बुक करता येणार असून दुकानांच्या वारंवार फेऱ्या कमी
होणार आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य मिळण्यासोबतच अनधिकृत लिंकिंग व काळाबाजाराला
आळा बसण्यास मदत होणार आहे. तसेच जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार खतांची शिफारस
मिळणार असल्याने अनावश्यक खत वापर टाळून उत्पादन खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे.
खत खरेदीची डिजिटल नोंद व खरेदी इतिहासही उपलब्ध राहणार आहे.
चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी Google
Play Store वरून ‘Framework for Fertilizer Sale (FFS Mobile App)’ डाऊनलोड करून घ्यावे,
असे आवाहन गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी, चिखली यांनी केले आहे.
अॅप किंवा प्रणालीबाबत अडचणी असल्यास कृषी अधिकारी दिनेश लक्ष्मण
लंबे (मो. 8275056458), कृषी अधिकारी प्रिती पाटील (मो. 8378874711) यांच्याशी संपर्क
साधावा. तसेच IFMS परवाना अद्ययावत करण्यासाठी महाधन कंपनीचे LFS प्रतिनिधी अविनाश
सांबरे (मो. 7620639059) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment