गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बीम व लेझर लाईटला बंदी

 

बुलढाणा, दि. १५ (जिमाका) : जिल्ह्यात दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सव शांततेत व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांमध्ये तसेच मिरवणुकीच्या मार्गावर वापरण्यात येणाऱ्या वाद्यांमध्ये प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर केल्यास पर्यावरणाची हानी तसेच मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकाशामुळे मिरवणुकीतील सहभागी भक्तगण तसेच विसर्जन निर्वाणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊन अपघात होण्याची व कायमस्वरूपी अंधत्व येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी प्राप्त अधिकारांचा वापर करून गणेशोत्सव कालावधीत विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रखर बीम लाईट व लेझर बीम लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे.

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे, आयोजक तसेच नागरिकांनी या आदेशाचे पालन करून गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर