पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ५० खाटांच्या आयुष रुग्णालयाचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सेवा संकल्प अभियानाचे उद्घाटन
बुलढाणा, दि. १५ (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत बुलढाणा येथे ५० खाटांच्या आयुष रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच जिल्हास्तरीय ‘सेवा संकल्प अभियान’चे उद्घाटन केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते दि. १७ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार वाढविण्यासोबतच नागरिकांना आयुर्वेदीय उपचार पद्धतीचा लाभ मिळावा, या उद्देशाने राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत बुलढाणा येथे ५० खाटांचे आयुष रुग्णालय उभारण्यात येणार आहे. १५ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या या इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री रुग्णालय परिसरात सकाळी ११ वाजता होणार आहे.
यावेळी जिल्हास्तरीय सेवा संकल्प अभियानाचे उद्घाटन, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत दिव्यांगजनांची तपासणी व साहित्य वाटप, महिलांसाठी स्तन व गर्भाशयाच्या आरोग्याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, ‘टी.बी.मुक्त भारत’ अभियानांतर्गत रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप, स्त्री रुग्णालयातील रुग्णांशी संवाद, फळवाटप तसेच वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड राहणार असून नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले आणि स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
मोफत विविध शस्त्रक्रियांसाठी रुग्णांनी संपर्क साधावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियानांतर्गत भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने गरजू रुग्णांसाठी मोफत किडनी प्रत्यारोपण, मणक्यांच्या शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास तसेच हिप व गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांसाठी मदत करण्यात येणार आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार येथे असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधावा. तसेच ८८३०३३०७५४ / ९५५२१०५७५० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
0000
Comments
Post a Comment