गणरायाच्या दर्शनासोबत कृषी योजनांचा जागर; ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाला नांदुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

 




 

बुलढाणा, दि. 22 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णय थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नांदुरा येथील श्रीमंत दगडूसेठ हलवाई गणेशोत्सव मंडळात कृषी विभागाच्या विविध योजना, सुविधा व उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सव काळात गणेश मंडळांच्या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधणे शक्य होत आहे. हाच धागा पकडून जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-२०२६’ च्या माध्यमातून ही माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी उपक्रम हाती घेतला आहे.

 

नांदुरा येथील कार्यक्रमात कृषी अधिकारी श्री. परमार यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने: योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, लागणारी महत्त्वाची कागदपत्रे, ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया,संबंधित विभागाशी संपर्क साधण्याची पद्धत आदी माहिती देण्यात आली.

 

‘गणरायाचे दर्शन आणि योजनांची माहिती’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना आणि सुविधांची माहिती थेट गावपातळीवर मिळत असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

या कार्यक्रमास कृषी अधिकारी परमार, श्रीमंत दगडूसेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर