वानखेड(संग्रामपूर) येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
वानखेड(संग्रामपूर)
येथे ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
बुलढाणा, दि.7 (जिमाका) : राज्य शासनाच्या
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ‘कसं काय?’
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वानखेड(संग्रामपूर)
येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा १ व २ सप्टेंबर
तसेच ३ व ४ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आली.
ग्रामीण नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व सुलभ आरोग्य
सेवा उपलब्ध करून देणे, तसेच ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे
हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व सार्वजनिक आरोग्य
विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण उपक्रम राज्यभर राबविण्यात
येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी
डॉ. स्नेहा पाटील तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रशेखर मारोडे यांच्या मार्गदर्शन
व सूचनेनुसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत माता-बाल व किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य
व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान व उपचार, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य
सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष उपचार, आरोग्य शिक्षण आणि समुदायस्तरीय आरोग्य
व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात व बाल आरोग्य, आजारांचे
लवकर निदान, आवश्यक उपचार व संदर्भ सेवा, गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे नियोजन व
प्रभावी अंमलबजावणी याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सत्रे, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या
माध्यमातून प्रशिक्षण अधिक परिणामकारक करण्यात आले.
कार्यशाळेत प्रशिक्षक डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे,
डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शिंदे, कविता खाडे, सुनीता जंजाळ व सुलोचना
पन्हाड यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य
अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, गटप्रवर्तक, आशा समन्वयक तसेच अन्य
आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक,
उपचारात्मक व पुनर्वसनात्मक आरोग्य सेवांना बळकटी देऊन प्रत्येक कुटुंबापर्यंत गुणवत्तापूर्ण
आरोग्य सेवा पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. लसीकरण, पोषण, स्वच्छता, तंबाखूमुक्ती
व व्यसनमुक्ती तसेच असंसर्गजन्य आजारांचे वेळेवर निदान आणि संसर्गजन्य आजारांपासून
प्रतिबंध याबाबत जनजागृती वाढविणे हा या अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे.
0000
Comments
Post a Comment