कीटकनाशक फवारणी करताना सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळाव्यात; जिल्हा परिषद कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

 

 

बुलढाणा, दि. २२ (जिमाका) :  जिल्ह्यात सध्या विविध पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी सुरू आहे. कीटकनाशकांचा अयोग्य वापर, शिफारशीपेक्षा अधिक मात्रा, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा अभाव तसेच फवारणी करताना आवश्यक खबरदारी न घेतल्यास विषबाधेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कीटकनाशक फवारणी करताना आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पुरोत्तम अनगाईत यांनी केले आहे.

फवारणीपूर्वी पिकासाठी शिफारस केलेलेच कीटकनाशक वापरावे. कीटकनाशकाच्या बाटलीवरील लेबल व पत्रकातील सूचना काळजीपूर्वक वाचून शिफारस केलेली मात्रा व पाण्याचे प्रमाण यांचे पालन करावे. द्रावण तयार करताना हाताने कीटकनाशकाला स्पर्श करू नये. यासाठी स्वतंत्र व स्वच्छ भांड्यांचा वापर करावा. अन्नपदार्थ किंवा घरगुती वापरातील भांड्यांचा वापर करू नये.

 

फवारणी करताना हातमोजे, मास्क किंवा श्वसनसंरक्षक, पूर्ण बाह्यांचे कपडे, गमबूट व संरक्षक गॉगल्स यांसारखी वैयक्तिक सुरक्षा साधने वापरणे आवश्यक आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. जोरदार वारा, पाऊस किंवा अत्यंत उष्ण हवामानात फवारणी टाळावी. फवारणी सुरू असताना खाणे, पिणे, धूम्रपान किंवा तंबाखू सेवन करू नये.

 

फवारणीच्या ठिकाणापासून मुले, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती तसेच जनावरे दूर ठेवावीत. गळती असलेला पंप, पाईप किंवा नोझल वापरू नये. फवारणीची उपकरणे व्यवस्थित असल्याची खात्री करूनच फवारणी करावी. बंदिस्त किंवा कमी वायुवीजन असलेल्या ठिकाणी फवारणी करणे टाळावे.

 

फवारणी पूर्ण झाल्यानंतर हात, चेहरा व शरीर साबणाने स्वच्छ धुवावे आणि शक्य असल्यास आंघोळ करावी. फवारणीसाठी वापरलेले कपडे इतर कपड्यांपासून वेगळे धुवावेत. उरलेले कीटकनाशक नदी, विहीर, तलाव किंवा नाल्यात सोडू नये. कीटकनाशके मूळ लेबल असलेल्या डब्यात सुरक्षित व कुलूपबंद ठिकाणी, मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावीत. रिकाम्या कीटकनाशकांच्या डब्यांचा पाणी, अन्न किंवा घरगुती वापरासाठी पुनर्वापर करू नये.

 

विषबाधेची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी : फवारणीदरम्यान किंवा त्यानंतर चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, जास्त घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे किंवा त्वचेची जळजळ अथवा बेशुद्ध होणे अशी लक्षणे आढळल्यास फवारणी तात्काळ थांबवावी. बाधित व्यक्तीला शक्य असल्यास खुल्या व ताज्या हवेत आणून तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. उपचारासाठी रुग्णालयात जाताना संबंधित कीटकनाशकाची बाटली किंवा त्यावरील लेबल सोबत न्यावे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय बाधित व्यक्तीला उलटी करविण्याचा प्रयत्न करू नये तसेच कोणतेही घरगुती उपचार करू नयेत, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

 

कीटकनाशकांचा सुरक्षित व शिफारशीनुसार वापर केल्यास मानवी आरोग्य, पशुधन आणि पर्यावरणावरील संभाव्य धोके टाळता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीपूर्वी, फवारणीदरम्यान आणि फवारणीनंतर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर