गणेशोत्सवाच्या मंचावरून शासनाचा ‘लोकसंवाद-२०२६’; जळगाव जामोद येथे आरोग्य तपासणीसह जनजागृती

 




 

मथाबाई गणेशोत्सव मंडळात नागरिकांना आरोग्य योजनांची माहिती; तपासणी व समुपदेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

बुलढाणा, दि. २१ (जिमाका) : गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्यापर्यंत शासनाच्या आरोग्यविषयक योजना आणि सुविधांची माहिती पोहोचविण्याचा उपक्रम जळगाव जामोद येथील मथाबाई गणेशोत्सव मंडळात राबविण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमात नागरिकांची आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक समुपदेशन तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली.

 

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळांच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत आहे. उत्सवाच्या आनंदासोबत आरोग्याची काळजी आणि शासकीय योजनांची माहिती, असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा यांच्या पुढाकाराने २० सप्टेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमात नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजना, उपलब्ध आरोग्य सुविधा आणि त्यांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

 

शासकीय योजनांची माहिती हीच लाभाची पहिली पायरी असल्याने नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत जागरूक राहून उपलब्ध आरोग्य सुविधा आणि योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला डॉ. सतीश नेवे, मथाबाई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आरोग्य तपासणी व जनजागृती उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

शासनाच्या विविध लोककल्याणकारी व आरोग्यविषयक योजनांची माहिती घेऊन पात्र नागरिकांनी उपलब्ध सोयी-सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर