गणेशोत्सवात आरोग्य जनजागृतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड ‘लोकसंवाद-२०२६’ व ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ : राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळात आरोग्य तपासणी व समुपदेशन

 







 

बुलढाणा, दि. २२ (जिमाका) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राजर्षी शाहू गणेशोत्सव मंडळ, राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., बुलढाणा येथे नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 

‘तिशीचा पल्ला – तपासणी अन् सल्ला’ या उपक्रमातून वयाची ३० वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून संभाव्य आजारांचे वेळीच निदान करून घ्यावे, हा संदेश देण्यात आला. शिबिरात नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.

 

या शिबिरास राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष मालती संदीप शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता बडगे, सहायक जिल्हा माहिती अधिकारी सतीश बगमारे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी धुताडमल आदी उपस्थित होते.

 

ScanO रोबोटद्वारे तोंडाच्या आजारांची तपासणी : शिबिराचे वैशिष्ट्य ठरलेल्या ScanO रोबोटच्या सहाय्याने तोंडाच्या आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. डॉ. सान्या यांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना तोंडाच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे तोंडाच्या आजारांची लक्षणे वेळीच ओळखून आवश्यक वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. शिबिराच्या आयोजनात डॉ. गौरव मोथे, डॉ. तौहीद खान, स्टाफ नर्स चेतन लहाने, एमपीडब्ल्यू निलेश जुमडे, परिचर शितल कंकाळ आणि एएनएम रोहिणी जाधव यांनी सहभाग नोंदविला.

 

गणेशोत्सवातून आरोग्याचा संदेश : यावेळी परिहार परिवाराच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली. जिल्हा शुश्रूषा अधिकारी अनंत वायझडे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य शिबिरांची माहिती दिली. विशेषतः ३० वर्षे व त्यावरील नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून उपलब्ध आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांना मोठ्या संख्येने नागरिक भेट देत असल्याने या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘लोकसंवाद-२०२६’ आणि ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान-२०२६’ अंतर्गत नागरिकांना विविध आरोग्य योजनांची पात्रता, उपलब्ध लाभ आणि लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत थेट माहिती देण्यात येत आहे.

 

नियमित आरोग्य तपासणी, वेळीच निदान आणि योग्य वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि उपलब्ध शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर