आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’;
आश्रमशाळांमध्ये ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’;
आदिवासी विकास विभागाचा निर्णय; सर्पमित्रांसह
तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे
बुलढाणा,
दि. १० (जिमाका) : डोंगराळ व
वनक्षेत्रालगत असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा
तसेच वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आदिवासी विकास
विभागातर्फे १९ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत
‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार आहे.
या परिसरात विद्यार्थ्यांचा साप, विंचू तसेच
इतर वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक
उपाययोजनांसोबतच आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याबाबत विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी
सर्पदंश हा अधिसूचित (Notifiable) आजार म्हणून घोषित केला आहे.
त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद व अहवाल सादर करणे, प्रतिबंधात्मक
उपाययोजना करणे तसेच Anti-Snake Venom (ASV) उपलब्ध
असलेल्या आरोग्य संस्थांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
अभियानांतर्गत प्रत्येक शाळा व वसतिगृहात
स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ, आरोग्य व वन विभागाच्या
सहकार्याने किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र आयोजित करण्यात
येणार आहे. साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे दूर जाणे, सापाला पकडण्याचा
अथवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंश झाल्यास बाधित व्यक्तीची हालचाल कमी ठेवणे
आणि तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे, याबाबत विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्पदंशासंदर्भातील अंधश्रद्धा व गैरसमज दूर
करण्यावरही भर दिला जाणार आहे. याशिवाय विभागाच्या डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातून
सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद याबाबत
तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत.
जनजागृती सत्रादरम्यान विद्यार्थ्यांच्या
सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेच्या परिसरात कोणताही जिवंत
साप आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करू नये, असे सक्त निर्देश
विभागाने दिले आहेत. मुख्याध्यापक, अधीक्षक व परिचारिका यांना आपत्कालीन
संपर्कांची माहिती दर तीन महिन्यांनी अद्ययावत करावी
लागणार आहे. यात जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, एएसव्ही उपलब्ध
किंवा साठवणूक असलेल्या आरोग्य संस्थेची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था, तसेच
स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक यांचा समावेश असेल. अभियानांतर्गत करण्यात
आलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करावा लागणार आहे.
आदिवासी
विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्पदंश जनजागृती अभियानामुळे
दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंशाबाबत
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि योग्य प्रतिबंधात्मक उपायांची जाणीव निर्माण होऊन
आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यास मदत होईल, असे आदिवासी
विकास विभागाचे आयुक्त गोपीचंद कदम यांनी सांगितले.
0000
Comments
Post a Comment