रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे; ‘मेरा रेशम मेरा अभिमान २.०’ अंतर्गत जिल्ह्यात मार्गदर्शन कार्यशाळा
बुलढाणा,
दि. १५ (जिमाका) : शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत उत्पन्नवाढीची
नवी संधी निर्माण करण्यासाठी रेशीम उद्योगाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन करण्यात
आले. ‘मेरा रेशम मेरा अभिमान २.०’ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित मार्गदर्शन
कार्यशाळांमधून रेशीम शेतीच्या शास्त्रीय पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
जिल्हा रेशीम कार्यालय, बुलढाणा आणि केंद्रीय रेशीम मंडळ,
बंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव तालुक्यातील उमरा, पळशी, पार्डे, जळगाव जामोद
तालुक्यातील वडगाव पाटण, मोताळा तालुक्यातील गिऱ्होली व रामनगर, सिंदखेड राजा तालुक्यातील
सोनाशी तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील मिभागाव येथे या कार्यशाळा घेण्यात आल्या. रेशीम
उत्पादक आणि रेशीम शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रेशीम शेतीतील प्रत्येक टप्प्यावर शास्त्रीय पद्धतीचा अवलंब
कसा करावा, याबाबत कार्यशाळेत सविस्तर माहिती देण्यात आली. तुती लागवड, रेशीम किटक
संगोपन, शेड व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, स्वच्छता आणि कोष उत्पादन
या बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. रेशीम उद्योगातून उत्पन्न व रोजगाराच्या विविध
संधी कशा निर्माण करता येतील, याची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.
रेशीम उद्योगासाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या
विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-G RAMG) तसेच ‘सिल्क समृद्धी
२’ या योजनांबाबतही कार्यशाळेत सविस्तर माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ घेऊन रेशीम
शेतीला चालना देण्याचे आवाहन करण्यात आले.
केंद्रीय रेशीम मंडळाचे (C.S.B.-CSRTI) मेसर्स सुगानेश्वरन
के., प्रदीप सी. आणि व्ही. एल. कुमार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, सी.एस.बी., बुलढाणा
तसेच आशिष जोशी, क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, बुलढाणा यांनी शेतकऱ्यांना
मार्गदर्शन केले.
00000
Comments
Post a Comment