गणेशोत्सवाच्या माध्यमातून योजनांचा जागर; ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमास प्रारंभ

*गणेशोत्सवाच्या माध्यमातून योजनांचा जागर; ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमास प्रारंभ*

*घाटपुरी येथे कृषी विभागाच्या योजनांची नागरिकांना माहिती; योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

*बुलढाणा, दि. १७ (जिमाका) :* गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती उपक्रमास सुरुवात करण्यात आली. खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील जगदंबा क्रीडा व्यायाम प्रसारक व बहुद्देशीय मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात कृषी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्याचा उपक्रम जिल्हा माहिती कार्यालयाने हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून घाटपुरी येथे ‘लोकसंवाद-२०२६’चा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे व तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, शेतकऱ्यांसाठीच्या सुविधा तसेच उपलब्ध उपक्रमांची माहिती दिली. योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, पात्रता व संबंधित विभागाशी संपर्क याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

गणरायाच्या दर्शनासोबत योजनांची माहिती, या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारचा संवाद उपयुक्त ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा आणि शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी सुनील पवार, जगदंबा क्रीडा व्यायाम प्रसारक व बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष संजय वासुदेव लाऊळकर, उपाध्यक्ष गोपाळ सिरसागर, जिल्हा माहिती कार्यालयाचे अनिल महल्ले, प्रतिक फुलाडी, नामदेव घट्टे आदी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर