ऑटोस्विचचा वापर बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन
कॅपेसिटरमुळे कृषीपंपाची
कार्यक्षमता वाढण्यास मदत; रोहित्रावरील भार कमी होऊन नादुरुस्तीचे प्रमाण घटणार
ऑटोस्विचचा वापर बंद करण्याचे
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन
बुलढाणा, दि. ८ (जिमाका)
: पावसाने दीड महिन्यापासून
दडी मारल्याने जिल्ह्यात कृषीपंपांचा वापर वाढला आहे. वीजपुरवठा सुरू होताच कृषीपंप
स्वयंचलितपणे सुरू करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी ऑटोस्विच बसविले आहेत. मात्र, एकाच
रोहित्रावरील अनेक कृषीपंप एकाच वेळी सुरू झाल्याने अचानक मोठ्या प्रमाणात विद्युतभार
निर्माण होतो. परिणामी रोहित्र जळणे, नादुरुस्ती, वीजवाहिन्यांवरील तारा तुटणे तसेच
वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या कृषीपंपाच्या
क्षमतेनुसार योग्य क्षमतेचा कॅपेसिटर बसवावा आणि ऑटोस्विचचा वापर तात्काळ बंद करावा,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
कॅपेसिटरच्या
वापरामुळे कृषीपंपाला आवश्यक रिॲक्टिव्ह पॉवर स्थानिक पातळीवर उपलब्ध होते. त्यामुळे
वीजवाहिन्यांमधून वाहणारा अतिरिक्त विद्युतप्रवाह कमी होऊन रोहित्रावरील भारही कमी
होतो. कृषीपंपांमध्ये प्रामुख्याने इंडक्शन मोटारींचा वापर होतो. मोटार सुरू असताना
वाहणाऱ्या अतिरिक्त इंडक्टिव्ह करंटमुळे वीजवाहिन्या व रोहित्रांवर ताण वाढतो. परिणामी
मोटार जळणे, रोहित्र ओव्हरलोड होणे, फॉल्ट होणे आणि एलटी लाईन ट्रिप होण्याचे प्रकार
घडू शकतात. योग्य कॅपेसिटर बसविल्याने हा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होते आणि कृषीपंपाची
कार्यक्षमताही सुधारते.
बाजारात ३ एचपी कृषीपंपासाठी १ केव्हीएआर, ५ एचपीसाठी
२ केव्हीएआर आणि ७.५ एचपीसाठी ३ केव्हीएआर क्षमतेचे कॅपेसिटर उपलब्ध आहेत. कॅपेसिटर
बसविताना तो इनकमिंग बाजूला न जोडता स्टार्टर आणि मोटारीला जोडलेल्या वायरला, म्हणजेच
मोटारीपूर्वी जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे मोटार सुरू असतानाच कॅपेसिटर कार्यरत राहतो.
कॅपेसिटर बसविण्यापूर्वी आणि बसविल्यानंतर केलेल्या
मोजमापात विद्युतप्रवाह ४.८ अँपिअरवरून ३.३ अँपिअरपर्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले
आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या क्षमतेनुसार योग्य कॅपेसिटर बसवून तसेच ऑटोस्विचचा
वापर टाळून महावितरणच्या वीज यंत्रणेवरील ताण कमी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment