आता मोबाईल अॅपद्वारे खत खरेदी; बुलढाणा जिल्ह्यात 25 सप्टेंबरपासून एफएफएस प्रणाली

 


 

बुलढाणा, दि. २२ (जिमाका) :  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोबाईल अॅपद्वारे खताची नोंदणी करून खरेदी करता येणार आहे. खत वितरण अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी कृषी विभागाची "फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल" (FFS) प्रणाली बुलढाणा जिल्ह्यात 25 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांचा अॅग्री स्टॅक फार्मर आयडी, जमिनीची माहिती आणि खत वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या iFMS प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना "Framework For Fertilizer Sale" अॅपमध्ये लॉग-इन करून जमीन, पीक आणि आवश्यक खताची माहिती भरावी लागेल. अर्ज सादर केल्यानंतर तयार होणाऱ्या QR कोड व टोकन क्रमांकाच्या आधारे अधिकृत विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल.

शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांकाद्वारे अॅपमध्ये लॉग-इन करून फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर जमिनीचा योग्य पर्याय निवडून जिल्हा, तालुका, गाव व गट क्रमांक भरावा लागेल. हंगामानुसार पीक निवडल्यावर शासनाच्या सर्वसाधारण खत शिफारशीप्रमाणे उपलब्ध खतांचे पर्याय दिसतील.

एका अर्जामध्ये एकापेक्षा अधिक प्रकारची खते निवडता येतील. अर्ज सादर झाल्यानंतर मिळणारा QR कोड किंवा टोकन क्रमांक घेऊन निवडलेल्या अधिकृत विक्रेत्याकडे जावे लागेल. विक्रेता कोड स्कॅन करून अर्ज व ओळख तपासल्यानंतर खत वितरित करेल.

या नव्या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि सहायक निबंधक यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी मित्र, कृषी सखी, एटीएम आणि बीटीएम यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचेही सांगण्यात आले आहे.

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी गावपातळीवर शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि लोकप्रतिनिधींना प्रणालीची माहिती देऊन व्यापक जनजागृती करावी. गावस्तरावरील कृषी सेवा केंद्रांशीही समन्वय साधण्याच्या सूचना आहेत.

FFS अॅपमध्ये आधार क्रमांकाद्वारे लॉग-इन करता येत असले तरी सुरळीत वापरासाठी शेतकऱ्यांनी अॅग्री स्टॅक फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. फार्मर आयडी नसल्यास भविष्यात इतर कृषी योजनांचा लाभ घेण्यात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

खत खरेदीसाठी जमिनीची माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. अर्ज किंवा खत वितरणासंबंधी अडचण आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा ग्रामस्तरावरील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदच्या कृषी विभागाने केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर