महात्मा जोतिराव फुले ‘महसूल लोक अदालत’ अभियान; सप्टेंबर २०२६ ते मार्च २०२७ दरम्यान आयोजन
महात्मा जोतिराव फुले ‘महसूल लोक अदालत’ अभियान; सप्टेंबर २०२६ ते
मार्च २०२७ दरम्यान आयोजन
महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी पक्षकारांनी सहभागी होण्याचे
आवाहन
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : महसूल प्रशासनातील
विविध अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित
असतात. एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील
अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल केला जात असल्याने अनेक दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात.
या पार्श्वभूमीवर महसुली दावे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने कायमस्वरूपी
निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’
राबविण्यात येत आहे.
महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती
वर्षाचे औचित्य साधून राज्याच्या महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा
जलद गतीने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी,
नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी
तसेच जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेले विविध प्रकारचे महसुली दावे
व अपील या अभियानात समाविष्ट करण्यात आले आहेत. १ सप्टेंबर २०२६ ते ३१
मार्च २०२७ या कालावधीत दर तीन महिन्यांनी मंडळ, तहसील, उपविभाग आणि
जिल्हास्तरावर महसूल लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मंडळ स्तरावरील लोक अदालतीचे
आयोजन २४ सप्टेंबर २०२६, ३ डिसेंबर २०२६ आणि ४ मार्च २०२७ रोजी करण्यात येणार आहे.
तहसील स्तरावर अनुक्रमे १ ऑक्टोबर, १० डिसेंबर आणि ११ मार्च रोजी, तर उपविभाग स्तरावर
८ ऑक्टोबर, १७ डिसेंबर आणि १८ मार्च रोजी लोक अदालत होणार आहे.
जिल्हास्तरावरील लोक अदालतीचे आयोजन अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
येथे १५ ऑक्टोबर, २४ डिसेंबर २०२६ आणि २४ मार्च २०२७ रोजी करण्यात येणार आहे. तसेच
उपविभागीय अधिकारी कार्यालय, खामगाव येथे अनुक्रमे १६ ऑक्टोबर, २८ डिसेंबर २०२६ आणि
२५ मार्च २०२७ रोजी लोक अदालत होणार आहे.
जिल्ह्यातील महसुली दाव्यांशी संबंधित सर्व पक्षकारांनी
सहमतीने व तडजोडीने आपले महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी या अभियानाचा
लाभ घ्यावा. संबंधित अर्धन्यायिक न्यायालयात अथवा कार्यालयात आवश्यक अर्ज सादर करून
‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानात’ सहभागी व्हावे,
असे आवाहन उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी
केले आहे.
00000
Comments
Post a Comment