राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय मागविण्याबाबत आवाहन

*राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अमरावती विभागातून सूचना व अभिप्राय मागविण्याबाबत आवाहन*

विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन

अमरावती, दि. 8 : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे.

या समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ व इतर संबंधित हितधारकांशी चर्चा करून भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय प्राप्त करून घेतले जाणार आहेत.

अमरावती विभागातील संबंधित हितधारकांशी चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष व सदस्य गुरुवार, दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5.30 दरम्यान नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे भेट देणार आहेत.

या अनुषंगाने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती व उपजिल्हाधिकारी (महसूल) अमरावती यांच्या संयुक्त नियंत्रणाखाली विशेष कक्षामार्फत दि. 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत, कार्यालयीन वेळेत सूचना व अभिप्राय स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यातील भरती परीक्षा पद्धत अधिक सक्षम, सुरक्षित, पारदर्शक व विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने अमरावती विभागातील सर्व संबंधित घटकांनी आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करून या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त, अमरावती यांनी केले आहे.     

समितीच्या भेटीसाठी वेळ मागण्यासाठी / समितीपुढे सूचना व अभिप्राय सादर करण्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

दि. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान आपले लेखी निवेदन/सूचना/अभिप्राय किंवा भेटीसाठी वेळ मागणारे पत्र खालीलपैकी कोणत्याही प्रकारे सादर करता येईल समितीसमोर चर्चेसाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरिकांनी खालील नमूद केलेल्या विशेष कक्षामध्ये किंवा ई-मेल पत्त्यावर अर्ज सादर करावा.

अ) प्रत्यक्ष सादर करण्याचे ठिकाण : नोडल अधिकारी : निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती. उपजिल्हाधिकारी, (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती. विशेष कक्ष :निवासी उपजिल्हाधिकारी यांची शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती. कालावधी : दि. 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर, 2026 कार्यालयीन वेळेत

ब) ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in किंवा rdc.amravati@gmail.com

ज्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी आपले लेखी अभिप्राय, सूचना, शिफारशी अथवा निवेदने विहित मुदतीत वरील ई-मेलवर पाठवावीत.

खालील प्रमुख विषयांवर सूचना व अभिप्राय अपेक्षित आहेत

विद्यमान परीक्षा प्रणालीचा आढावा : राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या सध्याच्या परीक्षा पद्धती व कार्यपद्धतीबाबत अभिप्राय.

पारदर्शकता व सुरक्षितता उपाय : परीक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सर्वंकष उपाययोजनांबाबत सूचना.

प्रश्नपत्रिका ते निकाल प्रक्रिया : प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षा उपाय.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर : डिजिटल प्रणाली, बायोमॅट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स, सीसीटीवी देखरेख व इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

गैरप्रकारांना प्रतिबंध : पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबत सूचना.

उत्कृष्ट पद्धतींचा अभ्यास : इतर राज्यातील अथवा देशांतील यशस्वी, आधुनिक व सुरक्षित परीक्षा प्रणालींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त पद्धती महाराष्ट्रात लागू करण्याबाबत सूचना.

परीक्षा केंद्रांसाठी किमान मानके : परीक्षा केंद्रांची निवड, पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळ व कार्यसज्जतेबाबत किमान मानके निश्चित करण्याबाबत अभिप्राय.

संस्थात्मक समन्वय : जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग व परीक्षा घेणाऱ्या संस्था यांच्यामध्ये प्रभावी समन्वयाची चौकट निर्माण करण्याबाबत सूचना.

तक्रार निवारण प्रणाली : उमेदवारांसाठी जलद, पारदर्शक व प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ करण्याबाबत सूचना.

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावतीमार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय यांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येतील. समिती या सर्व सूचनांचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी आपला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.

राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, “आपली सूचना - अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह भरती प्रक्रियेसाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल!” आहे असे आवाहन विभागीय आयुक्त, अमरावती यांनी केले आहे.
 
00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या