जन्म-मृत्यू नोंदणी अधिक अचूक व गतिमान करण्यावर भर


बुलढाणा, दि. २२ (जिमाका) : जन्म आणि मृत्यूची नोंदणी ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून नागरिकांच्या विविध नागरी हक्कांशी आणि शासकीय सेवांशी निगडित महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे प्रत्येक जन्म व मृत्यूची घटना विहित कालावधीत नोंदविण्यासोबतच नोंदणीतील अचूकता राखण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे.

 

महाराष्ट्रात जन्म-मृत्यू नोंदणीचे प्रमाण ९८.२ टक्के असून, देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर वाढविण्यात येत आहे. नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत मिळावीत आणि नोंदणी प्रक्रियेत त्रुटी राहू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

 

जिल्ह्यात जन्म-मृत्यूच्या घटनांची वेळेत नोंद करणे, संबंधित कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे, या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि उपलब्ध सुविधांची माहिती व्हावी, यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.

 

जन्म-मृत्यूची अचूक आकडेवारी ही शासनाच्या लोकसंख्याविषयक नियोजनासोबतच विविध कल्याणकारी योजना, आरोग्यविषयक धोरणे आणि प्रशासकीय नियोजनासाठी महत्त्वाचा आधार ठरते. त्यामुळे नोंदणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक घटनेची नोंद नियमितपणे, अचूक आणि विहित वेळेत करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी केले आहे.

 

नोंदणी प्रक्रियेत नागरिकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नोंदणी यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल सुविधांचा प्रभावी वापर करून नोंदणीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

000000 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर