वसाडी येथे ‘कसं काय?’ मोहिमेंतर्गत सीपीएचसी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न;

 

वसाडी येथे ‘कसं काय?’ मोहिमेंतर्गत सीपीएचसी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न;

‘अधिक उपचार, कमी रेफरल’ संकल्पनेवर आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

 

बुलढाणा, दि. 11 (जिमाका) :  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ‘कसं काय?’ मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी व प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथे दि. ७ व ८ सप्टेंबर रोजी समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

 

ग्रामीण नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील यांच्या सूचनेनुसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  कार्यशाळेत प्रशिक्षक डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेंद्रे, कविता खाडे, सुनीता जंवजाळ व सुलोचना पऱ्हाड यांनी विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शन केले.

 

प्रशिक्षणात माता-बाल व किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, निदान व उपचार, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष उपचार पद्धती, आरोग्य शिक्षण आणि समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता.

 

तांत्रिक सत्रे, गटचर्चा व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात व बाल आरोग्य, आजारांचे लवकर निदान व उपचार, आवश्यक संदर्भ सेवा तसेच गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे प्रभावी नियोजन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेत जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली उजवने, डॉ. सागर थेरोकार, आरोग्य सहाय्यक सुनील लोखंडे यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, गटप्रवर्तक, आशा समन्वयक व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करून नागरिकांना वेळेत व आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रशिक्षण कार्यशाळा उपयुक्त ठरली.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या