अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त–अपर मुख्यसचिव व्ही. राधा भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करणार
बुलढाणा, दि. 17 (जिमाका)
: भरती प्रक्रिया सुधारणा करण्यासंदर्भात
अमरावती विभागातील हितधारकांकडून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त झाल्या आहेत.
राज्यातील सर्व महसुली विभागातून प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा
आयोगासह (एमपीएससी) अन्य परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक,परिक्षार्थीस्नेही व सुटसूटित
करण्यासाठी निर्धारीत कालावधीत उच्चस्तरीय स्टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करेल,अशी
माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव तथा उच्च स्तरीय टास्क फोर्सच्या
अध्यक्ष व्ही. राधा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
श्रीमती राधा यांच्या अध्यक्षतेखालील
भरती प्रक्रिया सुधारणेसाठी नियुक्त उच्चस्तरीय टास्क फोर्सने पहिल्या सत्रात येथील
नियोजन भवनात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था,
लोकप्रतिनिधी व नागरिक आदी हितधारकांकडून अभिप्राय व सूचना ऐकूण घेतल्या. त्यानंतर
महसूल भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय
विभागाचे सचिव तथा टास्क फोर्सचे सदस्यसचिव डॉ.एन.रामास्वामी , विभागीय आयुक्त नयना
गुंडे,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी ,अपरआयुक्त (सा.प्र.)संजय
जाधव यावेळी उपस्थित होते.
सरळसेवेबाबत अत्यंत सखोल व अभ्यासपूर्ण
अभिप्राय व सूचनांसह पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रिये विषयी, एमपीएससीद्वारे घेण्यात
येणाऱ्या परिक्षेसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असावी, या परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक
असावे, या परिक्षांसाठी वार्षिक शुल्क आणि नोंदणी असावी,परीक्षांचे वेळेत निकाल लागावे,
प्रश्नपत्रिका सुरक्षित राहण्यासाठी प्रसंगी डिजीलॉकरचा उपयोग व्हावा,परिक्षार्थींच्या
अडचणी सोडविण्यासाठी एमपीएससीचा विशेष कक्ष स्थापन करणे ,राज्यात विभागवार एमपीएससीचे
कार्यालय उभारणे आदी महत्वाचे विषय अमरावती
विभागातील हितधारकांकडून प्राप्त झाले. यापूर्वी पुणे आणि नागपूर विभागाला टास्क फोर्सने
भेट दिली असून अमरावती विभागात तुलनेने अधिक अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त
झाल्याचे त्यांनी सांगितले.अमरावती विभागात ईमेल व प्रत्यक्ष निवेदनाद्वारे मोठया प्रमाणात
सूचना प्राप्त झाल्या आहेत आज प्रत्यक्ष हितधारकांनीही सूचना मांडल्या आहेत. यानंतर
पुढील तीन महसूल विभागाला टास्क फोर्स भेट देणार असून तेथील अभिप्राय व सूचना ऐकूण
घेणार आहे.
राज्यातील परीक्षार्थींना आपले मत शासनापर्यंत
अधिक चांगल्या पद्धतीने पोचवता यावे व भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्स प्रत्यक्ष हितधारकांशी
चर्चा करून त्यांची मत जाणून घेत आहे. राज्यातील सर्व विभागांतून प्राप्त माहितीचा
सखोल अभ्यास करण्यात येईल. प्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी),अन्य राज्यांच्या
लोकसेवा आयोगांना भेटी देवून त्यांच्याकडे कार्यान्वीत उत्तम पद्धतींचा अभ्यास करून
राज्यात एमपीएससीसहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षा व अन्य महत्वाच्या समकक्ष
परीक्षा पद्धतीतील आवश्यक सुधारणांचा दीर्घकालीन मसुदा तयार करून शासनाला सादर करण्यात
येईल असे त्यांनी सांगितले.शासनाच्या विविध विभागांकडून करण्यात येणारी भरती प्रक्रिया
तसेच एमपीएससीकडून या विभागाची पदे भरताना येणाऱ्या अडचणी,यासंदर्भातील प्रचलीत पद्धती
व त्यात आवश्यक बदल करण्यासंदर्भात सखोल अभ्यास करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
००००००


Comments
Post a Comment