जिल्हास्तर नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्साहात संपन्न

 


जिल्हास्तर नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्साहात संपन्न

१५ व १७ वर्षांखालील मुले तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद

 

बुलढाणा, दि. ४ (जिमाका):  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय नेहरू हॉकी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १५ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात एकूण १० संघांनी सहभाग घेतला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमलजी झंवर, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ. विजय धनावत, बुलढाणा जिल्हा हॉकी संघटनेचे सचिव प्रकाश खेत्रे, सहकार विद्या मंदिरचे क्रीडा विभाग प्रमुख सय्यद आबिद यांच्यासह सहभागी संघांचे क्रीडा शिक्षक, पालक, खेळाडू व पंच उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा तसेच उपस्थित क्रीडा शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

 

१५ वर्षांखालील मुलांच्या गटात सहकार विद्या मंदिर, बुलढाणा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल, लोणार संघाला द्वितीय क्रमांक मिळाला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटातही सहकार विद्या मंदिर, बुलढाणा संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला. लोणार सेंट्रल पब्लिक स्कूल, लोणार संघाने द्वितीय, तर जिल्हा परिषद हायस्कूल, रोहणा संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात सहकार विद्या मंदिर, बुलढाणा संघ विजेता ठरला, तर जिल्हा परिषद हायस्कूल, रोहणा संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना अल्पोपहार म्हणून केळीचे वाटप करण्यात आले.

स्पर्धेतील पंच म्हणून सय्यद आबिद, निलेश पवार, कुणाल व कपिल यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड यांनी केले, तर मनोज श्रीवास यांनी आभार मानले.

 

जिल्हास्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेतील तिन्ही प्रमुख गटांत सहकार विद्या मंदिर, बुलढाणा संघाने विजेतेपद मिळवत स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले. या यशामुळे खेळाडू, क्रीडा शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या