बुलडाणा जिल्ह्यात पर्यटन, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

 



























बुलडाणा जिल्ह्यात पर्यटन, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती – जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे

 पत्र सूचना कार्यालय नागपूरच्या वतीने बुलडाणा येथे एकदिवसीय ‘वार्तालाप माध्यम कार्यशाळेचे आयोजन

 

बुलढाणा, दि.9 : जिल्ह्यात जगप्रसिद्ध लोणार सरोवर, मातृतीर्थ सिंदखेडराजा, संतनगरी शेगाव तसेच बुलडाण्याजवळील अजिंठा-वेरूळ अशी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. या जिल्ह्याला विशेष भौगोलिक महत्त्व असून कृषी, उद्योग आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकासही झपाट्याने होत आहे. पायाभूत सुविधांच्या प्रगतीबरोबरच त्यातील उणिवांबाबत प्रसारमाध्यमे आपल्या वृत्तांकनातून प्रशासनासमोर वस्तुस्थिती मांडतात. यातून प्रशासनाला विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिशा मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी आज केले.

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नागपूर येथील पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित एकदिवसीय ‘वार्तालाप माध्यम कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. देवरे यांच्या हस्ते बुलडाणा रेसिडेन्सी, मलकापूर रोड येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.

 

कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी : जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिकाहा कार्यशाळेचा मुख्य विषय होता. कौशल्य विकास, पर्यटन, शाश्वत विकास तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांमधील उदयोन्मुख संधींबाबत माध्यम प्रतिनिधींमध्ये जागरूकता निर्माण करणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवरील तज्ज्ञांची तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली.

 

बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव आणि आनंद सागर, नैसर्गिक सौंदर्य लाभलेला राजूर घाट, वन्यजीवसंपन्न ज्ञानगंगा अभयारण्य, जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि गिरड येथील पुरातन शिवमंदिर या पर्यटनस्थळांमध्ये देशांतर्गत पर्यटन, सॉफ्ट अॅडव्हेंचर आणि वॉटर स्पोर्ट्ससारख्या पर्यटन उपक्रमांच्या विकासाच्या मोठ्या संधी आहेत. ही पर्यटनस्थळे एकमेकांशी जोडलेली असून भविष्यात या परिसराचा पर्यटन कॉरिडॉर विकसित होऊ शकतो. पर्यटन विकासात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असून पर्यटन आणि प्रसारमाध्यमांच्या परस्परपूरक भूमिकेमुळे पर्यटनवृद्धीला चालना मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या इंडिया टुरिझम, छत्रपती संभाजीनगर येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक संचालक स्नेहा पाटील यांनी केले.

 

बुलडाणा जिल्ह्यातील पर्यटनाच्या संधी आणि क्षमता वृद्धी व कौशल्य प्रशिक्षणया विषयावरील सत्रात त्या मार्गदर्शन करत होत्या. यावेळी त्यांनी पर्यटन विभागाच्या ‘प्रसाद योजनेबरोबरच पर्यटक मार्गदर्शक नोंदणी प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रातील शासकीय रोजगाराच्या विविध संधींची माहिती उपस्थितांना दिली.

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 : स्वच्छ शहर आणि स्मार्ट कचरा व्यवस्थापनया विषयावर नागपूर येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) चे संचालक डॉ. जयंत पाठक यांनी मार्गदर्शन केले.

 

घनकचरा व्यवस्थापनामध्ये नागरिक, स्थानिक प्रशासकीय संस्था तसेच बल्क वेस्ट जनरेटर (BWG) असलेल्या आस्थापनांची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकार ज्याप्रमाणे आयकर व्यवस्थेवर देखरेख ठेवते, त्याचप्रमाणे कचरा व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणांवरही देखरेख ठेवली जाणार असल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले.

 

कचरामुक्त शहरे आणि गावे निर्माण करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात प्रसारमाध्यमांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.

बुलडाण्यात कौशल्यविकासाच्या संधी : प्रसारमाध्यमांकडून आकांक्षा आणि अपेक्षा या विषयावर प्रेरक व्याख्याते डॉ. युगल रायलू यांनी मार्गदर्शन केले.

 

पत्रकारांनी संवेदनशीलता जोपासून बातमीचा विषय केंद्रस्थानी ठेवावा. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्रभावीपणे मांडण्यासाठी उत्तम संवादकाची भूमिका बजावताना देहबोली आणि संवेदनशीलता यांची सांगड घालणे आवश्यक आहे, असे डॉ. रायलू यांनी सांगितले.

 

या मार्गदर्शनपर सत्रानंतर पत्र सूचना कार्यालय, नागपूरचे माध्यम संवाद अधिकारी सौरभ खेकडे यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या पत्रकार कल्याण योजना, फॅक्ट चेक युनिट तसेच कार्यालयाच्या प्रसिद्धीविषयक कार्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना दिली.

 

यानंतर केंद्र शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद आयोजित करण्यात आला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लाभार्थी वंदनाताई टेकाडे यांनी योजनेच्या लाभाचा अनुभव कथन केला.

 

शेतकऱ्यांनी अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने फळपिके किंवा अन्य कृषी उत्पादने फेकून न देता त्यावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करून बाजारपेठेत आणावीत, असे आवाहन त्यांनी केले. स्वतः या योजनेचा लाभ घेऊन कृषी उत्पादनांवर मूल्यवर्धनाची प्रक्रिया करत भाजीपाला, मोरिंगा पावडर, लोणचे, साबण आदी जवळपास 35 उत्पादने तयार केली असून त्यांचे राज्यभर विपणन केले जात असल्याचे त्यांनी लसांगितले.

 

याच योजनेचे दुसरे लाभार्थी कडुबा कोल्हे यांनी ऑइल प्रोसेसिंग मशिनरीसाठी योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे अनुदान घेतल्याचे सांगितले. त्यांनी विविध आठ प्रकारच्या तेलबियांपासून खाद्यतेलाचे उत्पादन सुरू केले असून त्याचे राज्यभर विपणन होत असल्याची माहिती दिली. करडई, जवस यांसारख्या पारंपरिक तेलबियांपासून उत्पादित तेलाचे आयुर्वेदिक आणि आरोग्यविषयक महत्त्वही त्यांनी विशद केले.

 

कार्यशाळेच्या समारोपावेळी पत्रकारांनी कार्यशाळेबाबत आपले अनुभव आणि अभिप्राय व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सौरभ वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम संवाद अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) धनंजय वानखेडे यांनी केले.

00000


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या