केंद्र शासनाच्या योजनांच्या कामांना गती द्या; शेतकऱ्यांना व नागरिकांना योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करा — केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
केंद्र शासनाच्या योजनांच्या कामांना गती द्या;
शेतकऱ्यांना व नागरिकांना योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी
करा
— केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
‘दिशा’ समितीच्या बैठकीत विविध योजनांच्या प्रगतीचा
सविस्तर आढावा
बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : केंद्र
शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे
पोहोचणे आवश्यक आहे. योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून प्रलंबित
कामांना गती द्यावी. कोणत्याही योजनेच्या लाभापासून पात्र नागरिक वंचित राहणार नाही,
याची दक्षता घ्यावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष ना. प्रतापराव जाधव यांनी
दिले.
जिल्हा
नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. यावेळी
आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी
गुलाब खरात, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे यांच्यासह उपविभागीय अधिकारी आणि विविध
विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
संभाव्य पाणीटंचाईसाठी आतापासूनच नियोजन
केंद्रीया
राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, पावसाचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा
विचार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आराखडे तातडीने तयार करावेत. ‘अमृत’योजनेअंतर्गत
पाणीपुरवठा तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत.
कामांमध्ये दिरंगाई अथवा कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश
दिले. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत
प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. स्वतंत्र नळ
तसेच प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळत असल्याची
खात्री करावी. सुरू असलेल्या कामांना गती देतानाच कामांची गुणवत्ता कायम राखावी, असे
त्यांनी सांगितले.
मनरेगातून रोजगार वाढवा; मजुरीचे भुगतान तातडीने करा
महात्मा
गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकाधिक लोकहिताची कामे हाती घेऊन
रोजगाराच्या संधी वाढवाव्यात. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विभागांना
उद्दिष्टे निश्चित करून कुशल व अकुशल कामगारांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून
द्यावा. अकुशल कामगारांच्या कामाचे वेतन वेळेत अदा करावे. मनरेगाअंतर्गत सिंचन विहिरींच्या
कामांमध्ये गैरव्यवहार अथवा लाभार्थ्यांची पैशांसाठी अडवणूक होणार नाही, याची दक्षता
घ्यावी. सिंचन विहीर मंजूर होण्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंतची प्रक्रिया कालबद्ध
पद्धतीने राबवावी. मातोश्री पांदण रस्ता हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असून रस्त्यांची
कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
घरकुलाचा लाभ वेळेत द्या
प्रधानमंत्री
आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची
दक्षता घ्यावी. घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंजूर निधी तातडीने लाभार्थ्यांच्या
खात्यावर जमा करावा. देयके प्रलंबित ठेवू नयेत, असे निर्देश ना. जाधव यांनी दिले.
पीक नुकसानीची पाहणी तातडीने करा
पीक नुकसानीची
पाहणी तातडीने करून आवश्यक कार्यवाही करावी. ई-पीक पाहणी संबंधित शेतकऱ्यांकडून पूर्ण
करून घ्यावी. ई-केवायसीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत
प्रत्यक्ष पोहोचून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कामात विलंब करणाऱ्यांवर
कारवाई करावी. कोणत्याही शेतकऱ्याला अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी,
असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
पावसात
झालेल्या विलंबामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वीज
उपलब्ध होईल, याची खात्री करावी. वीज उपलब्धतेअभावी पिकांना पाण्याची कमतरता भासता
कामा नये. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री
सौर कृषी वाहिनी प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देताना ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’
योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचा अथवा प्रकारचा मोटार पंप खरेदी करण्याची सक्ती
करू नये, असे ना. जाधव यांनी स्पष्ट केले.
पीएम
गतीशक्ती अंतर्गत जिल्ह्यातील जालना खामगाव नवीन रेल्वे मार्गाशी संबंधित भुसंपादन
तसेच इतर सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने
काम करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश ना. जाधव यांनी दिले.
विविध योजनांचा सविस्तर आढावा
बैठकीत जिल्ह्यातील
सिंचन प्रकल्प, पुनर्वसन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, पीक विमा नुकसानभरपाई, पीक
कापणी प्रयोग, फळबाग पीक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीएम-सूर्यघर
मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०, मागेल त्याला सौर कृषी पंप
योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १५ वा केंद्रीय वित्त आयोग
निधी व खर्च, प्रधानमंत्री आवास योजना, अटल भूजल योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पीएम
पोषण शक्ती निर्माण योजना, पीएम श्री शाळा, अंगणवाडी केंद्र बांधकाम, भारतनेट, डिजिटल
इंडिया, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे स्थानक आणि उड्डाणपूल
आदी विविध योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
केंद्र
शासनाच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने
काम करावे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून कामांची प्रभावी अंमलबजावणी
करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले.
0000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment