बुलडाण्यात ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळेचे आयोजन;
बुलडाण्यात ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळेचे आयोजन;
‘कौशल्य विकास आणि भविष्यातील संधी’ विषयावर
प्रादेशिक माध्यमांच्या भूमिकेवर होणार चर्चा
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नागपूर येथील पत्र सूचना कार्यालयातर्फे बुलडाणा
जिल्ह्यातील पत्रकारांसाठी एकदिवसीय ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळेचे
आयोजन बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. बुलडाणा रेसिडेन्सी, गणेश
नगर, मलकापूर रोड येथे सकाळी १० ते ३ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
‘कौशल्य
विकास आणि भविष्यातील संधी : जनजागृतीमध्ये प्रादेशिक माध्यमांची भूमिका’ हा कार्यशाळेचा मुख्य विषय आहे. कार्यशाळेच्या
उद्घाटन सत्राला बुलडाणा जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार
आहेत.
कौशल्य विकास, पर्यटन, शाश्वत विकास तसेच
केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रमांमधील उदयोन्मुख संधींबाबत माध्यम
प्रतिनिधींमध्ये जागरूकता निर्माण करणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे.
नागरिकांमध्ये जागरूकता, आकांक्षा आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासोबतच
अचूक, वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहितीचा प्रसार करण्यामध्ये प्रादेशिक
माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाशी तसेच भविष्यातील
क्षमतेशी संबंधित विविध क्षेत्रे व विषयांवर कार्यशाळेत तांत्रिक सत्रांचे आयोजन
करण्यात आले आहे. यामध्ये कौशल्य विकास, पर्यटन, शाश्वत विकास आणि केंद्र
शासनाच्या विविध योजनांमधील संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच
‘सरकारी धोरणे, कार्यक्रम, उपक्रम व उपलब्धी, पत्रकार कल्याण योजना तसेच
पीआयबी फॅक्ट चेकबाबत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांना माहिती
पोहोचविण्यात पीआयबीची भूमिका’ या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.
कार्यशाळेदरम्यान केंद्र शासनाच्या विविध
योजनांचे लाभार्थी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यात संवाद सत्रही होणार आहे. या
माध्यमातून पत्रकारांना केंद्र शासनाच्या योजनांचा तळागाळातील लाभार्थ्यांवर
झालेला परिणाम प्रत्यक्ष जाणून घेता येणार आहे.
मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल
माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी आयोजित ही ‘वार्तालाप’ कार्यशाळा संवाद,
ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे.
विषयतज्ज्ञ, शासकीय अधिकारी तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद
साधण्याची संधी पत्रकारांना मिळणार असून, जनहिताच्या विषयांवर अधिक माहितीपूर्ण,
अचूक आणि जबाबदार वार्तांकनाला यामुळे चालना मिळणार आहे.
00000
Comments
Post a Comment