पीएम रिलीफ फंडातून बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना १ कोटी २० लाखांची मदत;

 


पीएम रिलीफ फंडातून बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना १ कोटी २० लाखांची मदत;

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयामार्फत पाठपुरावा

 

बुलढाणा, दि. ४ (जिमाका):    प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी (PM Relief Fund) अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४९ रुग्णांना आरोग्य उपचारासाठी तब्बल १ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर झाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात आला.

 

सन २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांनी हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोगावरील उपचार तसेच अन्य गंभीर आजारांच्या उपचारासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी खासदार सुविधा केंद्र व वैद्यकीय मदत कक्षाकडे अर्ज केले होते.

 

या संदर्भात एकूण ७३ रुग्णांची प्रकरणे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ४९ रुग्णांना १ कोटी २० लाख ६६ हजार रुपयांची मदत मंजूर होऊन संबंधित रुग्णालयांमध्ये उपचारासाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. आणखी २१ रुग्णांची प्रकरणे प्रक्रियेत असून, केवळ ३ प्रकरणे रद्द झाली आहेत. गंभीर आजारांवरील महागड्या उपचारांचा आर्थिक भार पेलणे अनेक रुग्णांसाठी आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून मिळणारे आर्थिक सहाय्य रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरत आहे.

 

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून रुग्णांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले. या माध्यमातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध झाली असून, गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या