‘कसं काय?’ मोहिमेंतर्गत मडाखेड येथे प्राथमिक आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 

 

 

बुलढाणा, दि. 24 (जिमाका) : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत ‘कसं काय?’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मडाखेड, ता. जळगाव जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा २१ व २२ सप्टेंबर २०२६ रोजी घेण्यात आली.

 

ग्रामीण नागरिकांना गावाजवळच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच ‘अधिक उपचार, कमी रेफरल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे, हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.

 

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यशाळेत माता-बाल व किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध, निदान व उपचार, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष उपचार पद्धती, आरोग्य शिक्षण व समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन आदी विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच गर्भवती व प्रसूतिपश्चात मातांची काळजी, नवजात व बाल आरोग्य, आजारांचे लवकर निदान, आवश्यक संदर्भ सेवा आणि गावपातळीवरील आरोग्य उपक्रमांचे प्रभावी नियोजन याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

 

प्रशिक्षक म्हणून डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. जीवन भारती, सुवर्णा बेलसरे, स्वाती शेळे, कविता खाडे, सुनीता जंबाळे व सलोचना फगाड यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास कदम, डॉ. सोनाली सातव, डॉ. रोशन येनकर, डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. चांडक, आरोग्य सहाय्यक सुनील लोखंडे यांच्यासह समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, एएनएम, एमपीडब्ल्यू, गटप्रवर्तक, आशा समन्वयक व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, गावपातळीवर नागरिकांना वेळेत आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षण कार्यशाळेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर