२८ सप्टेंबरला ‘माहिती अधिकार दिन’; शासकीय कामकाजातील पारदर्शकतेसाठी जनजागृती उपक्रम
बुलढाणा, दि. २४ (जिमाका) : नागरिकांना माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याबाबत माहिती व्हावी, तसेच शासकीय
कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढावे, या उद्देशाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी
‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील
विविध शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात
येणार आहेत. या उपक्रमांद्वारे नागरिकांना माहितीचा अधिकार, माहिती मिळविण्यासाठी अर्ज
करण्याची पद्धत, अर्जावरील कार्यवाही, माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया तसेच कायद्यान्वये
नागरिकांना प्राप्त असलेल्या अधिकारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित करण्यात
येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी सर्व शासकीय
कार्यालय प्रमुखांनी आपल्या स्तरावरून स्थानिक वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे तसेच उपलब्ध
अन्य माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहिती अधिकार
शाखेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. नागरिकांनी माहितीचा अधिकार अधिनियमाचा
प्रभावी व जबाबदारीने वापर करून शासकीय कामकाजातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग
वाढविण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment