वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदतवाढ; पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेसाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्जाची मुदतवाढ;
पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 4 (जिमाका): इतर मागास
बहुजन कल्याण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इतर मागास वर्ग (OBC),
विमुक्त जाती, भटक्या जमाती (VJNT) व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत
ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक
दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी
प्रवेशित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय
वसतिगृह योजनेसाठी अर्ज करावा. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील
तालुक्याच्या ठिकाणी प्रवेशित असलेल्या OBC,
SBC व VJNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार
योजनेसाठी अर्ज करावा.
त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी प्रवेशित
असलेल्या NT-C प्रवर्गातील
विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी ऑनलाइन
अर्ज करावा. या योजनांसाठी अर्ज करण्याकरिता विभागाने अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या योजनांमधून
विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध
करून देण्यात येते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न
करता शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
तांत्रिक
अडचणींसाठी संपर्क : ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचण
किंवा अर्ज प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी उद्भवल्यास सहायक
संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, बुलढाणा जिल्हा कार्यालय, सामाजिक न्याय भवन,
त्रिशरण चौक, बुलढाणा येथे संपर्क साधावा. पात्र
विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपले
ऑनलाइन अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment