‘लोकसंवाद-२०२६’ : गणरायाच्या दर्शनासोबत आरोग्य, महसूल योजनांचा जागर खामगाव सती फैल येथील हनुमान गणेशोत्सव मंडळात नागरिकांना योजनांची माहिती
बुलढाणा, दि. 21 (जिमाका)
: गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र आलेल्या नागरिकांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची
माहिती देत त्यांना उपलब्ध सुविधांशी जोडण्याचा उपक्रम खामगाव येथील सती फैल परिसरातील
हनुमान गणेशोत्सव मंडळात राबविण्यात आला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित
‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत आरोग्य व महसूल विभागाच्या विविध योजना, सुविधा आणि
उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला
‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या ठिकाणी मोठ्या
संख्येने एकत्र येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधून शासनाच्या योजना, उपक्रम व धोरणात्मक
निर्णयांची माहिती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम
राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत डॉ. देवेंद्र
भोपळे, वैद्यकीय अधिकारी, खामगाव, डॉ. श्वेता खेरडे, वैद्यकीय अधिकारी, अभिजीत जोशी,
नायब तहसीलदार (निवडणूक) आणि मंडळ अधिकारी नितीन देशमुख यांनी आरोग्य व महसूल विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. योजनांचा लाभ घेण्यासाठीची पात्रता,
आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित विभागाशी संपर्क करण्याबाबत उपस्थित
नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘गणरायाचे दर्शन आणि योजनांची
माहिती’ या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासनाच्या योजना व नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती थेट मिळत असल्याबद्दल उपस्थितांनी
समाधान व्यक्त केले. पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन उपलब्ध
सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास हनुमान व्यायाम
प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रेठेकर, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष दर्शनसिंह ठाकूर,
हनुमान व्यायाम मंडळाचे माजी अध्यक्ष चव्हाण, अनुप गवळी तसेच उपमाहिती कार्यालयाचे
अनिल महल्ले आदी उपस्थित होते.
0000






Comments
Post a Comment