विशेष लेख सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

 


       सेवा परमो धर्मःही केवळ एक उक्ती नाही, तर सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची भावना आहे. शासनाच्या योजना तयार होतात, निर्णय घेतले जातात; मात्र त्यांचा खरा अर्थ तेव्हा अधोरेखित होतो, जेव्हा त्या योजनांचा लाभ गावातील सामान्य कुटुंबापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतो. प्रशासन १७ सप्टेंबरपासून अशाच एका लोकाभिमुख अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे, त्यांच्या सहभागाचे कौतुक करणे आणि शासन नागरिकांच्या पाठीशी असल्याची भावना दृढ करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, त्यांच्या कार्यकाळातसेवा परमो धर्मःया भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध सेवा उपक्रम राबविले जात आहेत. याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यातसेवा संकल्प अभियानराबविण्याचा निर्णय घेतला आहे.हे अभियान म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नाही. सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा हा प्रयत्न आहे.

कार्यालयाच्या फेऱ्या कमी होणार

         गावातील एखाद्या नागरिकाला प्रमाणपत्र हवे असते, शेतकऱ्याला जमिनीची नोंद अद्ययावत करायची असते किंवा एखाद्या कुटुंबाला सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असतो. अशा वेळी अनेकदा विविध कार्यालयांमध्ये जावे लागते. सेवा संकल्प अभियानात ही प्रक्रिया शक्य तितकी सोपी करण्यावर भर देण्यात आला आहे.

           प्रत्येक तालुक्यातसेवा सेतूशिबिरे आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजेच अनेक सेवा एकाच ठिकाणी मिळण्याची सुविधा निर्माण होणार आहे.

शिबिरांच्या माध्यमातून कामांना गती

            या शिबिरांमध्ये फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद, शेतपाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, नळजोडणी, वीज जोडणी, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, आधार, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र तसेच /१२ आणि - नोंदी अद्ययावत करण्यासारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सोप्या भाषेत सांगायचे तरज्या सेवेसाठी नागरिकाला वारंवार कार्यालयात जावे लागते, ती सेवा शक्य तितकी त्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.

 गावात सेवा, गावातच समाधान

           सेवा संकल्प अभियानाचा विशेष भर ग्रामीण भागावरही आहे. प्रत्येक गावात आणि वॉर्डात स्थानिक गरजेनुसारसेवा माझे योगदानउपक्रम राबविण्यात येणार आहेत. गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.

गाव स्वच्छ ठेवणे, नदीघाट आणि बारवांची स्वच्छता करणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान करणे, आरोग्य तपासणी शिबिर घेणे, प्लास्टिकमुक्तीची जनजागृती करणे, जलसंधारण करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, रस्ते सुरक्षेबाबत जागृती करणे अशा अनेक उपक्रमांना या माध्यमातून चालना मिळणार आहे.

 शासनाची सेवा, समाजाचा सहभाग

         याचा अर्थ एकचशासनाची सेवा आणि समाजाचा सहभाग एकत्र आला, तर गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जमीन आणि महसूल विषयक कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची असतात. फेरफार नोंदी, /१२, -, स्वामित्व सनद, वनहक्क दावे यांसारख्या बाबी अनेकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या आहेत.

वनहक्क दाव्यांच्या बाबतीत नवीन दावे स्वीकारणे, जुन्या दाव्यांमधील दुरुस्ती करणे आणि पात्र दावे निकाली काढण्याची प्रक्रिया अभियानाच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.म्हणूनच सेवा संकल्प अभियानाचा लाभ गावातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन गरजांशी जोडून पाहणे महत्त्वाचे आहे.

 अंगणवाडीतही सेवा उत्सव

           लहान मुले आणि त्यांच्या मातांसाठीही या अभियानांतर्गत विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘अंगणवाडी उत्सवअंतर्गत अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांना आमंत्रित करून महिलांना आरोग्य आणि पोषणविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. मुलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, फळे मिठाईचे वाटप आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची तरतूद आहे.

ग्रामीण कुटुंबाच्या आरोग्याचा पाया मजबूत करण्यासाठी आई आणि बालकाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे अंगणवाडी उत्सव हा केवळ एक कार्यक्रम राहता आई, बालक आणि पोषण यांना जोडणारा उपक्रम ठरतो.

 गावातील तरुणांच्या कल्पनांना नवे व्यासपीठ

           आज ग्रामीण भागातील तरुणांकडे अनेक चांगल्या कल्पना आहेत. शेती, पाणी, शिक्षण, आरोग्य, रोजगार, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत ते नवे प्रयोग करू शकतात. योग्य संधी आणि व्यासपीठ मिळाले, तर या कल्पना मोठ्या बदलाचे कारण ठरू शकतात.सेवा संकल्प अभियानात राज्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेट इनोव्हेटर्स आणि ग्रामीण भागात नवे प्रभावी उपाय विकसित करणाऱ्या व्यक्तींना जोडण्यासाठीइनोव्हेशन चॅलेंजआयोजित करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्था, स्टार्टअप नेटवर्क, इन्क्युबेशन सेंटर आणि खासगी कंपन्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे. निवडलेल्या उत्कृष्ट कल्पनांना तज्ज्ञांसमोर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.

 विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा

            देशाचे भविष्य वर्गखोल्यांमध्ये घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या अभियानाशी जोडण्यात आले आहे. ‘विकसित भारतआणिमुलांच्या स्वप्नातील भारतया विषयांवर चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे.आजचा विद्यार्थी उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे विकसित भारताची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासोबतच त्यांच्या कल्पना आणि स्वप्नांना भविष्यातील भारताच्या उभारणीशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

 लाभार्थ्यांच्या घरापर्यंतआशीर्वादाचा दिवा

           शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या नागरिकाच्या घरापर्यंत जाऊनआशीर्वादाचा दिवाप्रज्वलित करण्याचा उपक्रमही या अभियानात आहे. विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन दीप प्रज्वलित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.सरकारची योजना कागदावर असते; पण तिचा लाभ जेव्हा एखाद्या कुटुंबाच्या घरात पोहोचतो, तेव्हा त्या योजनेला खरा अर्थ प्राप्त होतो. त्या समाधानाच्या क्षणाला जोडणारा हा उपक्रम आहे.

 बदलाची गोष्ट आता गावागावातून

        एखाद्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळाल्याने शेतीत बदल झाला, एखाद्या महिलेला बचत गटामुळे आर्थिक आधार मिळाला, एखाद्या विद्यार्थ्याला संधी मिळाली किंवा एखाद्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले, तर ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट राहत नाही. ती इतरांसाठीही प्रेरणा बनते.

म्हणूनचबदलाची गोष्टया उपक्रमातून विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला सकारात्मक बदल त्यांच्या स्वतःच्या शब्दांत समाजासमोर आणला जाणार आहे. त्यांच्या अनुभवांचे व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून संकलन करण्यात येणार आहे.

 सेवा संकल्पाची खरी दिशा

      सेवा संकल्प अभियानातील प्रत्येक उपक्रमामागे वेगवेगळी उद्दिष्टे असली, तरी त्यामागची भावना एकच आहेसामान्य नागरिकाला सेवा मिळविण्यासाठी अधिक सोपे, सुलभ आणि जवळचे वातावरण निर्माण करणे.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील संवाद लोकसहभाग वाढविणारा ठरणार आहे. योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना मिळावा, शासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि शासनाच्या योजना सामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. ‘माहितीअभावी पात्र व्यक्ती वंचित राहता कामा नये, ही या उपक्रमामागील प्रमुख भूमिका आहे. या अभियानाला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद त्याच्या यशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

(प्रवीण टाके), उपसंचालक,

विभागीय माहिती कार्यालय,  छत्रपती संभाजीनगर

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

नव्या वर्षात जिल्ह्यात तीन दिवस स्थानिक सुट्टी जाहीर