जागतिक थ्रोम्बोसिस दिनानिमित्त आरोग्य विभागाचे जनजागृती आवाहन

 

थ्रोम्बोसिसला ओळखा, जीव वाचवा!

 जागतिक थ्रोम्बोसिस दिनानिमित्त आरोग्य विभागाचे जनजागृती आवाहन

 

बुलढाणा, दि. 8 (जिमाका) :  थ्रोम्बोसिस अर्थात रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होण्याच्या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. जागतिक थ्रोम्बोसिस दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने थ्रोम्बोसिसची लक्षणे, जोखीम घटक आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

 

रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे थ्रोम्बोसिसची लक्षणे वेळीच ओळखून तातडीने वैद्यकीय उपचार घेणे महत्त्वाचे आहे.

 

एकाच पायाला अचानक सूज येणे, तीव्र वेदना होणे, त्वचेचा रंग लाल किंवा निळसर होणे तसेच सुजलेला भाग इतर भागापेक्षा उष्ण जाणवणे ही थ्रोम्बोसिसची संभाव्य लक्षणे आहेत. अचानक श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत तीव्र वेदना होणे ही गंभीर लक्षणे असून, अशावेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

 

दीर्घकाळ एकाच जागी बसून काम करणारे किंवा लांबचा प्रवास करणारे व्यक्ती, मोठ्या शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळ अंथरुणावर असलेले रुग्ण, लठ्ठपणा, मधुमेह व उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती तसेच धूम्रपान व तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये थ्रोम्बोसिसचा धोका वाढू शकतो.

 

थ्रोम्बोसिसपासून बचावासाठी नियमित शारीरिक हालचाल व व्यायाम करावा. दररोज किमान ३० मिनिटे चालण्याची सवय लावावी. दीर्घकाळ प्रवास करताना किंवा कार्यालयीन कामादरम्यान वेळोवेळी उठून चालावे. पुरेसे पाणी प्यावे. धूम्रपान, तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहावे.

 

थ्रोम्बोसिसची कोणतीही संभाव्य लक्षणे आढळल्यास विलंब न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या