जिल्ह्यातील पीक परिस्थिती, टंचाई उपाययोजना, पर्यटन, ऊर्जा व उद्योग क्षेत्राचा घेतला आढावा शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी - वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
• मुदतपूर्व
पीक पाहणी वेळेत पूर्ण करा
• शेतक-यांच्या
अडचणी संवेदनशीलतेने सोडवा
• पर्यटन
विकासासाठी ‘टुरिझम सर्किट’चा आराखडा तयार करा
बुलढाणा, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यात पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे शेती पिकांवर झालेल्या परिणामाची
प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे अचूक पंचनामे करावेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे
उभे असून, बाधित शेतकऱ्यांना निश्चितपणे भरीव मदत करण्यात येईल. सर्व शासकीय यंत्रणांनी
शेतकऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवून त्यांना दिलासा द्यावा,असे निर्देश वस्त्रोद्योग
मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात
विविध विषयाचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आमदार
संजय गायकवाड, आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार
देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधिक्षक निलेश तांबे विविध विभागाचे
विभाग प्रमुख तसेच ऑनलाईनव्दारे आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धात खरात आदी उपस्थित
होते.
जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांच्या
परिस्थितीचा आढावा घेताना मंत्री सावकारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मुदतपूर्व पीक
कापणीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पावसातील खंडामुळे पिकांवर झालेल्या
नुकसानीची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी व मोजणी करून पंचनामे पूर्ण करावेत, असे त्यांनी
सांगितले. पीक विमा कंपन्यांनी प्रशासनासोबत
संयुक्तपणे पंचनामे करून पात्र बाधित शेतकऱ्यांना विमा भरपाईचा लाभ तातडीने मिळवून
देण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देशही देण्यात आले.
संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या
पाण्याच्या योजना तसेच टंचाई निवारणाची कामे प्राधान्याने व वेळेत पूर्ण करावीत. जिल्ह्याच्या
सर्वांगीण विकासासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या
सूचनाही मंत्री सावकारे यांनी दिल्या.
पर्यटन विकासासाठी ‘टुरिझम सर्किट’चा आराखडा तयार करा
बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचाही
आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील धार्मिक, ऐतिहासिक व नैसर्गिक पर्यटनस्थळांचा एकात्मिक
विकास करून ‘टुरिझम सर्किट’ विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात
आल्या.
शेगाव : प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ असलेल्या शेगावचा
विकास आराखडा वेगाने पूर्ण करावा. मंदिर परिसरातील सुविधा वाढवून भाविकांना आवश्यक
सोयी उपलब्ध करून द्याव्यात. बाधित व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत
कार्यवाही करावी.
लोणार सरोवर : सरोवराच्या पाण्याच्या
पातळीत होणाऱ्या वाढीमागील शास्त्रीय कारणांचा अभ्यास करून सरोवराचे जतन करावे. पर्यटनाला
चालना देण्यासाठी एमआयडीसीअंतर्गत प्रलंबित कामे तसेच वाहतूक व इतर पायाभूत सुविधा
तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अंबाबरवा अभयारण्य परिसरात पर्यटकांसाठी
निवास, विश्रामगृह व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून पर्यटन सर्किट अधिक विकसित
करावे. तसेच राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथील मूलभूत सुविधा
तसेच विश्रामगृहांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेताना
नवीन पॉवर स्टेशन उभारणीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या
वीजविषयक मागण्यांवर महावितरणने तातडीने कार्यवाही करावी. नादुरुस्त सौर कृषी पंपांची
दुरुस्ती संबंधित कंत्राटदार किंवा कंपनीकडून त्वरित करून घ्यावी तसेच सौर कृषी पंप
योजनेचा विस्तार करण्याबाबतही कार्यवाही करावी. शेतातील वीज केबल चोरी रोखण्यासाठी
पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या.
उद्योग व रोजगारनिर्मितीवर भर
जिल्ह्यात ८०५ उद्योगांना १,७२७.६७ इतके
अनुदान देण्यात आले असून, त्यातून २ हजार ५७६ रोजगार निर्माण झाले आहेत. समूह विकास
प्रकल्पांना (क्लस्टर डेव्हलपमेंट) गती देण्यात यावी. जिल्ह्यात नवीन उद्योग आणून रोजगाराच्या
संधी वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधीसह संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे
निर्देश मंत्री सावकारे यांनी दिले.
0000




Comments
Post a Comment