शिवार फेरीतून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभूती
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; जिल्हाधिकारी
डॉ. प्रवीणकुमार देवरे व मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची उपस्थिती
बुलढाणा, दि. २१ (जिमाका) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दि. २० ते २२ सप्टेंबरदरम्यान
आयोजित तीन दिवसीय ‘शिवार फेरी’स उत्साहात प्रारंभ झाला. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा, कृषी विभाग आणि आत्मा (ATMA), बुलढाणा यांच्या संयुक्त
विद्यमाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या
दौऱ्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार
देवरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कृषी विद्यापीठातील
विविध संशोधन प्रक्षेत्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांसोबत त्यांनी विविध
पिकांचे प्रात्यक्षिक, आधुनिक कृषी तंत्रज्ञान तसेच संशोधनातून विकसित करण्यात आलेल्या
तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
पिकांचे प्रात्यक्षिक अन् आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन,
तूर, कपाशी, ज्वारी यासह भरडधान्ये, भाजीपाला आणि फुलपिकांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रांना
भेट दिली. तसेच आधुनिक सिंचन पद्धती व प्रभावी जलव्यवस्थापनाच्या विविध मॉडेल्सची माहिती
घेतली. संशोधनावर आधारित आधुनिक तंत्रज्ञान, रोगप्रतिकारक वाण आणि उत्पादनवाढीच्या
विविध पर्यायांची प्रत्यक्ष शेतात पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली.
कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी
विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ, कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून आयोजित
या अभ्यास दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली.
विद्यापीठातील संशोधनातून विकसित झालेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि
त्याचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर वाढविणे हा शिवार फेरीचा प्रमुख उद्देश आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवनवीन
तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अंगीकार करून शाश्वत व अधिक उत्पन्नक्षम शेतीकडे वाटचाल
करावी. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या सातत्याने संपर्कात राहून तज्ज्ञांचे मार्गदर्शन
घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले.
तीन दिवस चालणाऱ्या या शिवार फेरीस बुलढाण्यासह
परिसरातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी भेट देणार असून, आधुनिक कृषी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा
शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
Comments
Post a Comment