गणेशोत्सवात महाप्रसाद वितरणासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक
गणेशोत्सवात महाप्रसाद वितरणासाठी अन्न
सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक
* अन्न सुरक्षा आयुक्तांचे गणेश मंडळांना आवाहन
* भाविकांना सुरक्षित अन्न मिळण्यासाठी मार्गदर्शक
सूचना जारी
बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : आगामी गणेशोत्सव कालावधीत विविध गणेश मंडळांकडून
मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद व भंडारा याचे आयोजन केले जाते. या काळात भाविकांना सुरक्षित
व स्वच्छ अन्न उपलब्ध व्हावे आणि अन्नविषबाधेसारख्या घटना टाळाव्यात, यासाठी गणेश मंडळांनी
अन्न सुरक्षा कायद्यातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अन्न सुरक्षा आयुक्तांच्या
वतीने करण्यात आले आहे.
गणेश
मंडळांसाठी अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे. ते याप्रमाणे
:
परवानगी व नोंदणी: महाप्रसाद/भंडारा आयोजनापूर्वी
Complaints.mahafda.in या पोर्टलवर 'उत्सव परवानगी अर्ज' या सदरात जाऊन अर्ज करणे आवश्यक
आहे. जे मंडळ स्वतः अन्न शिजवणार आहेत, त्यांनी FSSAI Portal वर नोंदणी करून नोंदणी
प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
कच्च्या मालाची खरेदी: स्वयंपाकासाठी
लागणारे तेल, तूप, रवा, मैदा, साखर, मसाले, भाज्या, ड्रायफ्रूट्स इत्यादी सर्व कच्चे
अन्नपदार्थ खरेदी करताना बिले सोबत ठेवावीत.
लेबलची पाहणी: कच्च्या अन्नपदार्थांचे लेबल तपासून
उत्पादक तारीख, वापराची अंतिम तारीख, उत्पादकाचा पत्ता, घटकांची माहिती आणि FSSAI परवाना/नोंदणी
क्रमांक तपासूनच खरेदी करावी.
कॅटरर्सची निवड: स्वयंपाकासाठी कॅटरर्स नेमले
असल्यास त्यांच्याकडे वैध परवाना असल्याची खात्री करून परवानाधारक कॅटरर्सकडूनच अन्नपदार्थ
तयार करून घ्यावेत.
कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी: महाप्रसाद तयार
करणाऱ्या कॅटरर्सच्या कामगारांचे वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र पडताळून घ्यावे.
स्वच्छता व पाण्याचा वापर: महाप्रसाद अत्यंत
स्वच्छ जागेत व निर्जंतुक केलेल्या भांड्यांमध्येच तयार करावा. स्वयंपाकासाठी स्वच्छ
व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करावा. बोअरवेलचे पाणी वापरत असल्यास त्याची प्रयोगशाळेतून
तपासणी करून घ्यावी.
दूध व दुग्धजन्य पदार्थ: दूध व दुग्धजन्य
पदार्थ ताजे आणून त्यांचा त्वरित वापर करावा. प्रसादाचे अन्नपदार्थ १२ तास किंवा त्यापेक्षा
जास्त कालावधीसाठी साठवून ठेवू नयेत.
खाद्यरंग व तेलाबाबत दक्षता: महाप्रसादासाठी
परवानगी नसलेल्या खाद्यरंगांचा, अखाद्य घटकांचा व औद्योगिक रसायनांचा वापर टाळावा.
खाद्यतेलाचा पुनर्वापर वारंवार करू नये; तेलाचे 'टोटल पोलार कंपाऊंड' २५ पेक्षा जास्त
होणार नाही याची दक्षता घ्यावी.
गौरी-गणेश
उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करताना कोणत्याही प्रकारची अन्नविषबाधेसारखी
अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी सर्व गणेश मंडळांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत
पालन करावे.
00000
Comments
Post a Comment